एखाद्या सरकारी भूखंडावर अतिक्रमण करून बांधकाम उभारायचे आणि नंतर ती जागा रिकामी करण्यासाठी सरकारकडूनच भरपाई आणि पुनर्वसन पदरात पाडून घ्यायचे, या सूत्रावर सगळय़ाच शहरांत बेकायदा बांधकामे फोफावत आहेत. याचेच एक ताजे उदाहरण डोंबिवली पश्चिमेकडील रेतीबंदर येथे सध्या पाहायला मिळत आहे. या ठिकाणी खाडीपूल उभारण्यात येणार असल्याची कुणकुण लागताच स्थानिक भूमाफियांनी  खाडीकिनाऱ्याला लागून असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा मोठय़ा प्रमाणात बेकायदा चाळी उभारण्यास सुरुवात केली आहे. या मार्गाने भूखंडांवर आपली मालकी दाखवून पुढे पूल उभारणीच्या वेळी त्या मोबदल्यात मोठी रक्कम आणि अधिकृत घरे पदरात पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, ही बांधकामे किनारा नियमन क्षेत्रात (सीआरझेड) मोडत असतानाही पालिकेकडून त्यावर कारवाई झालेली नाही.
डोंबिवली आणि ठाणे या दरम्यानचा रस्ता प्रवास अधिक जलद आणि सहज करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने माणकोली येथे खाडीवर पूल उभारण्यात येणार आहे. प्रशासकीय अडचणींमुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या या पुलाच्या उभारणीचा मार्ग अलीकडेच मोकळा झाला. या पुलाच्या निविदा प्रक्रियेचे काम एमएमआरडीएने सुरू केले आहे. या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात मोठागाव ते रेतीबंदर मार्गावर २२० मीटर लांबीच्या पोहोच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेने पालिका हद्दीतील या रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या ‘एमएमआरडीए’च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, या रस्त्याच्या रुंदीकरणाची कुणकुण लागताच स्थानिक भूमाफियांनी येथील जागा अडवण्यास सुरुवात केली आहे. तीन महिन्यांपूर्वी पालिका अधिकाऱ्यांनी या पोहोच रस्त्याची पाहणी केली होती. त्यावेळी येथे काही प्रमाणात चाळी बांधण्यात आल्याचे आढळले होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांत या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा चाळींची उभारणी करण्यात आली आहे.
रस्ता रुंदीकरण करताना अडसर ठरणाऱ्या या चाळी हटवण्याची वेळ येईल तेव्हा एमएमआरडीएकडून भरघोस नुकसानभरपाई वसूल करता येईल, या विचाराने ही बांधकामे झाल्याची चर्चा आहे. रेतीबंदरच्या चाळींवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची गरज आहे. वेळेवर पोलीस बंदोबस्त मिळत नाही. त्यामुळे कारवाई करणे अवघड होते, असे ‘ह’ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाहणी करून कारवाई
पालिका हद्दीतील रेतीबंदर खाडी किनारी सी. आर. झेड. क्षेत्रात, सरकारी जमिनीवर बेकायदा चाळी उभारण्यात येत असतील तर प्रभाग अधिकाऱ्याला या जागेची पाहणी करून त्यांच्याकडून या बांधकामांचा सविस्तर अहवाल मागवण्यात येईल. त्यानुसार या बेकायदा चाळी तोडण्याची कारवाई करण्यात येईल. डोंबिवली ते ठाणे जोडणारा महत्त्वाचा उड्डाण पूल या भागात होणार आहे. त्या पुलाला कोणत्याही प्रकारचा अडथळा पालिकेकडून सहन केला जाणार नाही.
– संजय घरत, अतिरिक्त आयुक्त, कल्याण डोंबिवली पालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal construction on both side of retibandar road dombivali
First published on: 23-06-2015 at 05:39 IST