कल्याण- टिटवाळा येथील इंदिरानगर भागात उद्यान, बगिचा आरक्षणावर उभारण्यात येणाऱ्या बेकायदा चाळींची बांधकामे सोमवारी अ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. आरक्षित भूखंडांवरील सहा चाळींची बांधकामे तोडल्याने माफियांना मोठा तडाखा बसला आहे.

इंदिरानगर येथील सार्वजनिक सुविधेच्या आरक्षणावर बेकायदा चाळी माफियांकडून बांधल्या जात असल्याची माहिती अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांना मिळाली. आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त सुधाकर जगताप यांनी एकही बेकायदा बांधकाम नव्याने उभे राहता कामा नये असे आदेश साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

हेही वाचा >>> कल्याण, डोंबिवलीत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

साहाय्यक आयुक्त वाघचौरे यांनी तातडीने कर्मचाऱ्यांसह बांधकामांच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केली आणि आरक्षित भूखंडांची खात्री केली. वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण नियंत्रण विभागातील कर्मचाऱ्यांनी जेसीबी, घणांच्या साहाय्याने चाळींची बांधकामे जमीनदोस्त केली. नवेकोरे दरवाजा, खिडक्या, पत्रे यांचा चुरा करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ टिटवाळा, मांडा, बल्याणी परिसरातील आरक्षित भूखंडावर एकही नव्याने बांधकाम उभे राहणार नाही याची काळजी घेतली आहे. असे बांधकाम निदर्शनास आल्यास ते तातडीने जमीनदोस्त केले जाते. खासगी जमिनींवर बांधकामे उभी राहत असल्यास त्यांची नगररचना विभागाकडून खात्री करुन त्या बांधकामांना परवानगी नसेल तर ती बांधकामे तातडीने थांबविली जातात.” दिनेश वाघचौरे- साहाय्यक आयुक्त अ प्रभाग कार्यालय.