कल्याण – नागरिकांच्या जीविताला, सार्वजनिक मालमत्तेला धोका पोहचवेल अशाप्रकारचे टिटवाळा मांडा पश्चिम भागातील आझादनगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले एक भव्य धोकादायक होर्डिंग पालिकेच्या अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी बुडासकट कापून भुईसपाट करण्यात आले.

टिटवाळा मांडा पश्चिममध्ये आझादनगर येथे कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या परवानग्या न घेता काही मंडळींनी एकत्रित येऊन एक ३० बाय ४० फूट आकाराचे भव्य होर्डिंग सार्वजनिक रस्त्याच्या, पादचारी मार्गाच्या बाजुला उभारले होते. वादळ, वारा, पाऊस असला की या बेकायदा होर्डिंगवर लावण्यात आलेल्या पत्र्यांचा मोठ्याने आवाज परिसरात यायचा. वादळ वारा सुरू असेल तर पादचारी, वाहन चालकांना या भागातून जाताना होर्डिंग वाऱ्याच्या वेगाने तुटेल अशी भीती वाटायची. मांडा, टिटवाळा, आझादनगर भागातील अनेक नागरिकांनी या बेकायदा भव्य फलका विषयी पालिकेच्या अ प्रभागात तक्रारी केल्या होत्या.

हा फलक लावणारे इसम आपल्या सोयीच्या जाहिराती या फलकावर लावत होते. अन्य कोणाला या मुख्य वर्दळीच्या फलकावर जाहराती लावायच्या असतील तर त्यांंच्याकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी पालिकेच्या मालमत्ता विभाग, अ प्रभाग कार्यालयाकडे येत होत्या. घाटकोपर येथील फलक कोसळण्याच्या घटनेनंतर न्यायालय, शासनाने सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या फलकांविषयी नियमावली जाहीर केली आहे. या नियमाचे उल्लंघन करून टिटवाळा मांडा येथे हे होर्डिंग लावण्यात आले होते. या बेकायदा फलकाच्या माध्यमातून काही इसम परस्पर व्यवसाय करत असल्याचे आणि पालिकेला एक पैशाचाही लाभ या फलकाच्या माध्यमातून होत नसल्याचे अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या निदर्शनास आले. या फलक लावणाऱ्या इसमांचा शोध घेण्यात आला.

या भव्य फलकामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. महिनाभरात पावसाळा सुरू होईल. त्यावेळी हा भव्य फलक कोसळला तर जीवित हानी होण्याची शक्यता आहे. असा विचार करून साहाय्यक आयुक्त पाटील यांनी शनिवारी तोडकाम पथक, जेसीबीच्या साहाय्याने आझादनगर येथे जाऊन शनिवारी बेकायदा फलकाचे दोन्ही आधार खांंब कटरच्या साहाय्याने कापून टाकले. फलकाला दोर बांधून ते जेसीबीला बांधण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने फलकाला ताण देताच काही क्षणात बेकायदा फलक जमीनदोस्त झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कारवाईने टिटवाळा, मांडा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. टिटवाळा शहर परिसर विद्रुप करणाऱ्या फलकांविरुध्द जोरदार कारवाई मोहीम सुरू केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.