डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील पांडुरंगवाडी भागात मुख्य वर्दळीच्या पदपथालगत मंगळवारी पहाटेच्या सुमारास काही इसमांनी पाऊस सुरू असताना एक चहाची लोखंडी टपरी आणून ठेवली आहे. एका सोसायटीच्या दर्शनी भागात अचानक ही टपरी आणून ठेवल्याने त्याचा त्रास या भागातील व्यापारी, रहिवाशांना होत आहे.

मानपाडा हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून शहरातील, शहराबाहेरून येणारी जड, अजवड वाहने वाहतूक करीत असतात. शिळफाटयाकडे हा रस्ता जातो. या रस्त्यावर काही इसमांनी रात्रीच्या वेळेत एक चहाची लोखंडी पत्र्यांनी तयार केलेली टपरी आणून ठेवली आहे. या टपरीमुळे या भागात वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना चालण्यास अडथळे, स्थानिकांना आपली वाहने उभी करण्यात अडथळे येऊ लागले आहेत. या बेकायदा टपरीप्रकरणी या भागातील रहिवासी कुलीनकांत जैन यांनी पालिका उपायुक्त, ग प्रभाग साहाय्यक आयुक्त आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानपाडा रस्त्यावरील जयकुल आर्केड इमारतीसमोर ही टपरी आणून ठेवण्यात आली आहे. ही टपरी उभी करण्यात काही राजकीय मंडळींचा सहभाग असल्याची स्थानिक पातळीवर चर्चा आहे. जयकुल आर्केड समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा टपरी लोटत आणण्याचा प्रकार कैद झाला आहे. तीन ते चार जण पाऊस सुरू असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लोखंडी टपरी लोटत आणून जयकुल आर्केड समोरील रस्त्यावर उभी करतात. या भागातील वाहने ते काढून बाजुला उभी करतात. टपरी उभी केल्यानंतर ते निघून जातात. ही टपरी तातडीने हटविण्याची स्थानिकांची मागणी आहे.