कल्याण- प्रशासनावर वरिष्ठांचा वचक राहिला नसल्याने प्रशासनाचा प्रभाग स्तरावरील कारभार पूर्णपणे ढेपाळला असल्याची चर्चा आता कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. प्रशासनात ताळमेळ राहिला नसल्याने त्याचा गैरफायदा काही समाजंकटक घेत आहेत. प्रशासनातील अनागोंदी कारभाराचा गैरफायदा घेऊन कल्याण पश्चिमेतील आधारवाडी भागात सफाई कामगारांच्या हजेरी निवाऱ्यात एका विक्रेत्याने बिनधास्तपणे भाजीपाल्याचे दुकान सुरू केले आहे.

आरोग्य विभागाच्या अखत्यारितील पालिका सफाई कामगारांच्या हजेरी निवाऱ्यातील भाजीपाल्याचे दुकान पाहून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने आता भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू केला आहे का, असे प्रश्न आधारवाडी भागातील नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी भागातील माता रमाबाई आंबेडकर उद्याना जवळ मोहिंदरसिंग काबुलसिंग शाळा रस्त्यावर पालिकेच्या सफाई कामगारांसाठीचा हजेरी निवारा आहे.

हेही वाचा >>>ठाणे : मानपाडा चौकातील टायटन रुग्णालयाजवळ भीषण आग, आगीमुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी

याठिकाणी दोन गाळे आहेत. सफाई कामगारांनी सकाळी स्वच्छता कामासाठी आल्यावर याठिकाणी हजेरी लावून मग कामाला जायचे आहे. पालिकेच्या मालकीचे दोन्ही गाळे असताना एका गाळ्या मध्ये एका भाजीपाला विक्रेत्याने पालिका अधिकाऱ्यांना आव्हान देत एका गाळ्यात भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू केला आहे. सकाळी आठ ते रात्री उशिरापर्यंत हा भाजीपाला विक्रेता पालिकेच्या गाळ्यांमध्ये भाजी विक्री व्यवसाय करतो. पालिकेच्या क प्रभागाचे फेरीवाला हटाव पथकाचे कामगार नियमित या भागात येतात त्यांना हे बेकायदा दुका दिसत नाही का, असे प्रश्न रहिवासी करतात.

हेही वाचा >>>डोंबिवलीत तरुणावर चाकूने हल्ला

पालिकेच्या मालमत्ता अज्ञात व्यक्ति बळकावून तेथे व्यवसाय करत असल्याने या विक्रेत्यांना पाठबळ देणारी शक्ती कोण, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. पालिकेच्या गाळ्यामध्ये भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू करण्यात आल्याने या भागातील स्थानिक माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आधारवाडी येथील रमाबाई आंबेडकर उद्याना जवळील सफाई कामगारांच्या हजेरी निवाऱ्याचे गाळे पालिकेने भाड्याने भाजी विक्रे्त्याला भाड्याने दिले आहेत का, या गाळ्या मधील व्यवसायापासून पालिकेला किती भाडे मिळते याची माहिती देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा >>>ठाकुर्ली रेल्वे रुळा जवळील प्रवाशांना घातक ठरणारा दिशादर्शक हटविला

ही मागणी करुन तीन महिने उलटले तरी आयुक्त, मालमत्ता विभाग,आरोग्य विभागाकडून कोणतीही माहिती माजी नगरसेवक सुधीर बासरे यांना देण्यात येत नाही. येत्या सात दिवसात हजेरी निवाऱ्यातील इत्यंबूत माहिती प्रशासनाने दिली नाही तर पालिके समोर उपोषण करण्याचा इशारा माजी नगरसेवक सुधीर बासरे आणि त्यांच्या समर्थकांनी दिला आहे.

एका ठेकेदार माजी नगरसेवकाने आपल्या समर्थकाला सफाई कामगारांच्या हजेरी निवाऱ्यात बळजबरीने घुसविले असल्याची माहिती बासरे यांना मिळाली आहे. हा प्रकार आपण आयुक्तांच्या निदर्शनास आणणार आहोत, असे बासरे म्हणाले. पालिकेतील बनावट रस्ते नस्ती गहाळ प्रकरणात हा माजी नगरसेवक अडचणीत आला आहे. तो हे प्रकार करत असल्याचे पालिकेतील चर्चेतून समजते.

“आधारवाडी येथे पालिकेच्या मालमत्तेत कोणी भाजीपाला व्यवसाय करत असेल तर त्या स्थळाची पाहणी करुन संबंधितावर कारवाई केली जाईल.” –तुषार सोनावणे,साहाय्यक आयुक्त,क प्रभाग, कल्याण.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.