अंबरनाथ : विविध औषधोपचार करत असूनही लग्नाच्या १२ वर्षांनंतरही मूलबाळ होत नसल्याने पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या पश्चिमेतील आयुध निर्माण संस्थेच्या निवासी वसाहतीत हा प्रकार समोर आला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

अंबरनाथच्या आयुध निर्माण संस्थेच्या क्रीडांगणासमोर रोनीतराज मंडल (३७) हा त्याची पत्नी नीतू कुमारी मंडल (३०) हिच्यासोबत वास्तव्याला होता. मूळच्या बिहारमधील असलेल्या या दोघांचे २०११ साली लग्न झाले होते. २०१६ साली रोनीतराज हा आयुध निर्माण संस्थेत जोडारी म्हणून कामाला लागला. आयुध निर्माण संस्थेत एच ३८ या कामगार वसाहतीत हे दाम्पत्य वास्तव्याला होते. त्यांच्या लग्नाला १२ वर्षे झाली, तरी त्यांना मूलबाळ होत नसल्याने नीतू कुमारीवर उपचार सुरू होते. मात्र रोनीतराज हा याच कारणावरून तिच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमी तिच्याशी वाद घालत होता.

हेही वाचा – अति धोकादायक इमारती रिकाम्या करा, ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी दुपारी रोनीतराज याने मद्यपान केल्यानंतर तो जेवत असताना त्याचे पत्नीसोबत पुन्हा वाद झाले. हा वाद सुरू असताना त्याने पत्नीच्या डोक्यात अवजड वस्तू मारून तिची हत्या केली. यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्याने शेजाऱ्यांना बोलावत आपल्या पत्नीची कुणीतरी हत्या केल्याचा बनाव रचला. या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. मात्र रोनीतराज सांगत असलेल्या गोष्टीवर संशय आल्याने पोलिसांनी त्यालाच ताब्यात घेत चौकशी सुरू केली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृत नीतू कुमारी हिचा पती रोनीतराज यालाच संशयित म्हणून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे