बदलापूरः बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात मातीचा भराव टाकण्याचा प्रकार पश्चिमेतील सत्संग विहार या संस्थेच्या वतीने करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिकांनी लक्ष वेधल्यानंतर अंबरनाथ महसूल प्रशासनाने संस्थेला १० कोटी १६ लाख रूपयांच्या दंडाचे तसेच नदीतील मातीचा भराव काढून नदी पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. मात्र संस्थेने या आदेशाची पूर्तता न केल्याने अखेर अंबरनाथ तहसिलदार कार्यालयाच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यानंतर पर्यावरणप्रेमींना समाधान व्यक्त केले असले तरी संस्थेवर कठोर कारवाई करून असे प्रकार भविष्यात होऊ नये यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले जाते आहे.
ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून उल्हास नदीकडे पाहिले जाते. शेकडो गावे, विविध नगरपालिका, महापालिका उल्हास नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. बारवी धरणातून सोडले जाणारे पाणी वाहून नेण्यासाठीही उल्हास नदी महत्वाची आहे. या नदीवर ठिकठिकाणी पाणी उचल आणि शुद्धीकरण केंद्रे आहेत. त्यामुळे उल्हास नदीचे मुळ रूप राखणे, नदी प्रदुषणुक्त ठेवणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही वर्षात नदी प्रदुषण दिवसेंदिवस वाढते आहे. त्याचसोबत नदी पात्रात अतिक्रमण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. एप्रिल महिन्यात बदलापूर शहरातील पश्चिमेतील सत्संग विहार या धार्मिक संस्थेने ८ हजार ९१२ ब्रास माती, १९६ ब्रास दगड आणि ८३ ब्रास दगड पावडर असा भराव उल्हास नदीच्या पात्रात टाकला. त्यामुळे उल्हास नदीचा प्रवाह मार्गच बदलला.
याप्रकरणी अंबरनाथ तहसिलदार अमित पुरी यांनी या गौणखनिजाचा भरावाचा दंड म्हणून९ कोटी ९३ लाख ६७ हजार १४१ रूपये आणि या भरावासाठी वापरण्यात आलेली यंत्र समुग्रीचा जातमुचलका म्हणून २२ लाख ५० हजार असा एकूण १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ रूपये दंड भरण्याचे आदेश दिले होते. तसेच उल्हास नदीतील अनधिकृत भराव २५ मेपर्यंत काढून नदी पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. दंडासह आदेशाचे पालन न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे २६ मे रोजी रायगड आणि बदलापूर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने बदलापुरात इशारा पातळी गाठली. यात मोठ्या संख्येने हा मातीचा भराव नदी पात्रात मिसळून गेला.
सत्संग विहार संस्थेने ३० मेपर्यंत मुदत देण्याचीही मागणी केली होती. मात्र त्यानंतरही भराव न काढल्याने अंबरनाथ तहसिल कार्यालयाने कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना सत्संग संस्थेने उल्हास नदी पात्रात केलेला अनधिकृत भराव काढून सत्संग संस्थेच्या जागेत टाकावा तसेच उल्हास नदीपात्र पुर्ववत करावे असे आदेश दिले. या कामाचे खर्चाचे देयक सत्संग या संस्थेकडे देऊन देयकाची रक्कम वसूल करावी, असेही नमूद करण्यात आले होते.
त्यानंतर अंबरनाथ तहसिलदार अमित पुरी यांनी कुळगाव मंडळ अधिकाऱ्यांना संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अखेर बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात सत्संग विहारच्या व्यवस्थापकांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र संंबंधित संस्थेवर कठोर कारवाईची मागणी होते आहे.