बदलापूरः गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कुळगााव बदलापूर नगरपालिकेच्या मालमत्ता कराचा घोळ यंदाच्या वर्षातही कायम आहे. यंदाच्या वर्षात पालिका प्रशासनाने वितरीत केलेल्या मालमत्ता कराच्या बिलांमध्ये चुकीच्या पद्धतीने थकबाकीच्या रकमा दाखवल्या असून त्यामुळे बिलांचे आकडे वाढले आहेत. ते आकडे पाहून मालमत्ताधारक चक्रावले आहेत. त्यामुळे मालमत्ता कर भरण्याकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. तर हा गोंधळ केंद्रीय संगणीयक प्रणालीमुळे झाला असून येत्या आठवडाभरात नव्या प्रणालीच्या माध्यमातून ही त्रुटी मिटवली जाईल, असे आश्वासन पालिकेच्या मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिले आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कराचा गोंधळ गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर समोर आला आहे. गेल्या दोन वर्षात संगणकीय प्रणालीतील घोळामुळे ऑनलाईन कर भरणा बंद होता. त्यामुळे पालिका मुख्यालयाबाहेर कर भरणा करण्यासाठीसाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे समोर आले होते. त्यानंतर केंद्रीय संगणकीय प्रणाली कुळगाव बदलापूर पालिका प्रशासनाने स्विकारली. त्यानंतर काही महिने बील भरण्याच अडचणी येतच होत्या. यंदाच्या वर्षात कर भरणा करण्यातील अडचणी सुटल्या असल्या तरी एक नवाच गोंधळ पुढे आला आहे.
गेल्या काही दिवसात बदलापूर शहरात पालिका प्रशासनाच्या वतीने मालमत्ता कराच्या बिलांचे वाटप करण्यात आले. आर्थिक वर्ष २०२५-२६ या वर्षाच्या कराचे हे बिल आहेत. मात्र या बिलांमध्ये चुकीच्या पद्धतीने थकबाकी देण्यात आल्याचे उघड झाले आहे. बहुतांश मालमत्ता धारकांनी गेल्या वर्षाचा कर आधीच अदा केला होता. मात्र त्यानतंरही या कराच्या बिलांमध्ये थकबाकी समाविष्ट झाली आहे. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षातील कर हा दुप्पट ते तिप्प्ट दिसतो आहे. या बिलांमुळे नागरिकांत गोंधळ उडाला आहे. यातील काही नागरिकांनी लागलीच पालिका मुख्यालयात जाऊन याबाबत तक्रारी देण्यास सुरूवात केली आहे. काही मालमत्ता धारकांच्या बिलात गेल्या तीन ते चार वर्षांची थकबाकीही समाविष्ट करण्यात आली आहे. परिणामी काही घरगुती बिले ही १६ ते १८ हजारांपर्यंत गेल्याने मालमत्ताधारक चक्रावले आहेत.
या सर्व गोंधळामुळे मालमत्ता धारकांनी कर भरणा करण्याकडे पाठ फिरवली आहे. मालमत्ता कराच्या बिलातील घोळ मिटल्यानंतरच बिल भरणा करून अशी भूमिका मालमत्ताधारकांची आहे. काही मालमत्ताधारक ऑनलाईन पद्धतीने बिल अदा करतात. त्यांना अधिकची रक्कम दिसत असल्याने त्यांनीही बिल भरणा सध्या थांबवला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनालाही याचा फटका बसण्याची भीती व्यक्त होते आहे.
आठवडाभरात गोंधळ संपेल
कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी लोकसत्ताशी बोलताना असा गोंधळ झाल्याचे मान्य केले आहे. केंद्रीय संगणकीय कर प्रणालीतील हा गोंधळ असून याबाबत वरिष्ठ कार्यालयालाही कळवण्यात आले आहे. तसेच नवी संगणकीय प्रणाली येत्या आठवडाभरात सक्रीय होऊन हा गोंधळ संपेल, असे आश्वासनही गायकवाड यांनी दिले आहे.