डोंबिवली पश्चिमेतील मानसी ऑर्केडमधील जय मल्हार फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये गेल्या दीड वर्षांपासून २३ लाख १४ हजार ३६० रुपये किंमतीची ६२ हजार ५८३ युनिट विजेची चोरी झाल्याचा प्रकार महावितरणच्या कारवाईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी हॉटेल चालक जितेंद्र विनायक म्हात्रे याच्याविरुद्ध कल्याण (पश्चिम) येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई मोहिमेंतर्गत राहुल नगर येथील मानसी ऑर्केडमधील जय मल्हार फॅमिली रेस्टॉरंटच्या मीटरची तपासणी करण्यात आली. मीटरचे सील हाताळल्याचे व मीटरशी छेडछाड केल्याचे प्राथमिक तपासणीत आढळले. त्यामुळे हे संशयित मीटर ताब्यात घेऊन ग्राहकासमक्ष महावितरणच्या कार्यालयात चाचणी प्रयोगशाळेत अधिक तपासणी करण्यात आली. यात मीटरमध्ये अतिरिक्त सर्किट व छोटा अँटेना लावून मीटरची गती कमी केल्याचे निष्पन्न झाले. सहायक अभियंता सुरज माकोडे यांच्या फिर्यादीवरून हॉटेल चालक जितेंद्र म्हात्रे याच्या विरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.