डोंबिवली : पत्नी सतत मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असते याचा राग येत असल्याने झालेल्या भांडणातून रविवारी रात्री संतप्त पतीने रागाच्या भरात पत्नीवर चाकूने हल्ला करून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली टेकडी येथील एका सोसायटीत हा प्रकार घडला आहे. पती, पत्नी दोघेही मद्यपी आहेत. सुरेखा राजू हिवाळे (४७) असे गंभीर जखमी पत्नीचे नाव आहे. राजू शामुवेल हिवाळे (५३) असे फरार हल्लेखोर पतीचे नाव आहे. ते विक्रोळी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांना मद्य सेवन करण्याचे व्यसन आहे.

मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी राजू हिवाळे यांचा मुलगा अनिकेत राजू हिवाळे यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले, डोंबिवलीतील नांदिवली टेकडी येथील ग्रीन हेरिटेज सोसायटीमध्ये हिवाळे यांचे एकत्रित कुटुंब राहते. या कुटुंबात दोन भाऊ, त्यांची पत्नी, मुले, आई, वडील असा परिवार राहतो. प्रत्येक जण नोकरी, व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका करतात. पत्नी सुरेखा ही मद्य सेवन करून मोबाईलवर अन्य कोणाशी तरी सतत बोलत असते याचा राग पती राजू यांच्या मनात होता. या विषयावरून त्यांच्यात सतत वाद होत होते.

हेही वाचा : महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?

पोलिसांनी सांगितले, रविवारी सुट्टी असल्याने तक्रारदार अनिकेत हिवाळे कुटुंबासह बहीण अर्पा शिंदे हिच्या संदप गावातील घरी गेले होते. रात्रीच्या वेळेत भोजन करून ते घरी परतले. त्यांनी बहिणीकडून आई, बाबांंना भोजन आणले होते. आईने भोजन घेण्यास नकार दिला. यावरून आई सुरेखा, वडील राजू यांच्यात भांडण सुरू झाले. यावेळी दोघांनी मद्य सेवन केले होते. दोघांमधील वाद मुलांनी पुढाकार घेऊन मिटविला. सर्व कुटुंबीय घरात झोपले होते. त्यावेळी मध्यरात्री दोनच्या सुमारास आई सुरेखा हिचा जोरदार किंचाळण्याचा आवाज आला. ती मोठ्याने ओरडत होती. त्यावेळी कुटुंबीय उठले. त्यांनी आईजवळ जाऊन पाहिले तर तिच्यावर वडील राजू यांनी धारदार चाकुने वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सुरेखा यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तिची परिस्थिती गंभीर असल्याने तिला शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ला केल्यानंतर आरोपी राजू यांनी चाकू घरात फेकून देऊन पळ काढला. मानपाडा पोलीस फरार राजू यांचा शोध घेत आहेत.