डोंबिवली : येथील आयरे तुकारामनगर भागातील गावदेवी मंदिरात शुक्रवारी रात्री देवीच्या दर्शनासाठी आलेल्या स्थानिकांना याच भागातील १५ जणांनी दगडांचा मारा, धारदार हत्यारांचे वार करत गंभीर जखमी केले. पूर्व वैमनस्यातून हा वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात व्यावसायिक ओंकार श्रीराम भगत (२७) आणि त्याचे मित्र गंभीर जखमी झाले आहेत. ओंकारच्या तक्रारीवरून पोलिसांनी सचीन केणे, नरेंद्र जाधव, गौरव जुळवे, अखिलेश धुळप, वरूण शेट्टी, योगेश सुर्वे, नितीन यादव, गौरव फडके आणि इतर १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

माजी नगरसेवक रवी पाटील, नितीन पाटील यांनी हस्तक्षेप केल्याने याठिकाणी होणारा गंभीर प्रकार टळला. पोलिसांनी सांगितले, ओंकार आणि प्रतिस्पर्धी गटात पूर्ववैमनस्यातून काही वाद आहेत. त्यांच्यात या विषयावरून नेहमी धुसफूस सुरू असते. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता नवरात्रोत्सव असल्याने ओंकार आपल्या मित्रांसह आयरे गावातील गावदेवी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी तेथे सचीन केणे आणि इतर १५ जण धारदार शस्त्रे घेऊन उपस्थित होते. ओंकारला पाहताच त्यांनी ओकांरशी भांडण उकरून काढून त्याला मारहाण सुरू केली. ओंकारचे मित्र वाद मिटविण्यासाठी पुढे आले तर त्यांनाही दगडीचा मारा, धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करण्यात करण्यात आले.

हेही वाचा : दिव्यात ठाकरे गटाचा भाजपला धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रकार पाहून देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची पळापळ झाली. महिला, लहान मुलांची सर्वाधिक अबाळ झाली. माजी नगरसेवक रवी पाटील, नितीन पाटील यांनी दोन्ही गटांना थोपवून धरले म्हणून पुढील अनर्थकारी घटना टळली. ही माहिती रामनगर पोलिसांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी आले. साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप तपास करत आहेत.