डोंबिवली – डोंबिवलीतील पूर्व भागात आपल्या कुटुंबीयांसोबत राहत असलेल्या एका तरूणीने मामाने आपला मोबाईल काढून घेतला म्हणून रागाच्या भरात इमारतीच्या अकराव्या माळ्यावरून उडी मारून मंगळवारी आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
समीक्षा नारायण वड्डी (२०) असे मरण पावलेल्या तरूणीचे नाव आहे. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. ती काटई बदलापूर रस्त्यावरील खोणी भागातील फिफ्टी फिफ्टी ढाबा भागात आपल्या मामाच्या घरी राहत होती. या आत्महत्येप्रकरणी गणेश प्रधान यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली आहे.
गणेश प्रधान यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गणेश प्रधान यांची भाची मयत समीक्षा वड्डी ही आपल्या राहत्या घरी मंगळवारी रात्री मोबाईलवर बोलत होती. यावेळी समीक्षाच्या हातामधील मोबाईल बोलत असतानाच मामा गणेश प्रधान यांनी काढुन घेतला. तिने अभ्यास करावा, सतत मोबाईलवर बोलू नये, असा मामाचा चांगला दृष्टीकोन होता, असे पोलिसांनी सांगितले.
मामाने आपल्या हातामधील मोबाईल बोलत असतानाच काढुन घेतल्याने राग आल्याने समीक्षाने घरात कोणाला काहीही न बोलता ती घरातील सभागृहाच्या सज्जामध्ये गेली. तेथून तिने अकराव्या माळ्यावरून जमिनीवर उडी मारली. समीक्षाने जमिनीवर उडी मारताच तेथे मोठा आवाज झाला. कुटुंबीयांनी तात्काळ इमारतीच्या तळमजल्याला धाव घेतली. सोसायटीमधील इतर रहिवासी मदतीसाठी धावून आले. गंभीर जखमी समीक्षाला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे उपचार सुरू करण्यापूर्वीच ती मृत असल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.
भारतीय नागरी सुरक्षा संंहिता कलमाने पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करून घेतली आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, साहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, उपनिरीक्षक गणेश भाबड यांनी घटनास्थळी भेट देऊन याप्रकरणाची माहिती घेतली. याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.