डोंबिवली : गोदामांचे आगर म्हणून ओळखले जाणाऱ्या, तसेच जिन्सच्या बेकायदा कारखान्यांसाठी प्रसिध्द असलेल्या गोळवली, भाल, वसार भागातील बेकायदा चाळी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने भुईसपाट केल्या. या बेकायदा चाळी निवास, काही चाळी भंगार गोदामांसाठी भूमाफियांनी सरकारी, खासगी जमिनींवर बांधल्या होत्या. गोळवली भागात मोठ्या प्रमाणात भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. पावसाळ्यात भंगार ठेवण्यासाठी भंगार विक्रेते निवासी चाळींचा भाग वापरतात. तर काही भागात भूमाफिया गोदामे उभारून ते भाड्याने भंगार विक्रेत्यांना देतात. भंगार विक्रेत्यांना भाड्याने चाळीतील खोली, गोदाम बांधून दिले की दरमहा आठ ते दहा हजार रूपये भाडे भूमाफियाला मिळते.

गोळवली, वसार, भाल गाव हद्दीत माळरानांवर गोदामे, चाळी उभारण्यात येत आहेत, अशी माहिती आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना मिळाली होती. त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. त्यावेळी आठहून अधिक बेकायदा चाळी, भंगारांसाठी गोदामे उभारली जात असल्याचे मुंबरकर यांच्या निदर्शनास आले. या बेकायदा चाळी चौबे नावाचा भूमाफिया बांधत असल्याचे स्थानिकांंनी मुंबरकर यांना सांगितले. चौबे हे कारवाईच्यावेळी प्रत्यक्ष हजर राहिले नाहीत. विहित प्रक्रियेचा अवलंंब करून लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेत आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तोडकाम पथक घेऊन गोळवली, वसार, भाल गाव हद्दीत चौेबे भूमाफियाने उभारलेल्या सर्व बेकायदा चाळी जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केल्या.

हेही वाचा : डोंबिवलीत नांदिवली येथे पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, पत्नी सतत मोबाईलवर बोलत असल्याच्या संशयातून चाकू हल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोळवली परिसरात गोदाम किंवा निवासासाठी कोणीही बेकायदा बांधकाम करीत असेल तर त्या जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. या भागातील भंगार विक्रेत्यांची बांधकामे, त्याची अधिकृतता तपासून या भागात तळ ठोकून असलेल्या भंगार विक्रेत्यांवर लवकरच आचारसंहितेचा भंग होणार नाही या चौकटीतून कारवाई केली जाणार आहे, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांंगितले. आय प्रभागात बेकायदा इमारती,चाळी तोडण्याची मोहीम सतत सुरू असल्याने या भागातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.