डोंबिवली– येथील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य विरूपाक्ष कुलकर्णी यांचे सोमवारी दुपारी प्रदीर्घ आजाराने येथे निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित कन्या, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ते विज्ञान विषयाचे प्राध्यापक होते. या महाविद्यालयातील अध्यापनाच्या अनुभवातून विरूपाक्ष कुलकर्णी पेंढरकर महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. अनेक वर्ष ते पेंढरकर महाविद्यालयाचे प्राचार्य होते. प्राचार्य असताना त्यांनी महाविद्यालयात विविध शैक्षणिक, साहित्यक, सांस्कृतिक, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे उपक्रम राबविले. महाविद्यालयातील क्रीडा उपक्रम, एन. सी. सी. बळकट करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. उपक्रमशील प्राचार्य म्हणून ते ओळखले जात होते.
महाविद्यालयातील अध्यापनाच्या काळात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांची घडण केली. त्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी देश, विदेशात उच्चपदस्थ आहेत. व्यवस्थापन महाविद्यालय प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यात त्यांनी त्यावेळी महत्वाची भूमिका बजावली होती.