डोंबिवली – दोन कुटुंबे जोडणारा लग्न हा एक पवित्र सोहळा आहे. या सोहळ्याचे अलिकडच्या काळात इव्हेन्टमध्ये झालेले रूपांतर खूप चिंताजनक आहे, अशी मते डोंबिवली महिला महासंघातर्फे गणेश मंदिरातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात विविध क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली.

या परिसंवादात साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, आगरी समाज प्रबोधन संस्थेचे सचिव काळू कोमासकर, डोंबिवली महिला महासंघाच्या सनदी लेखापाल जयश्री कर्वे, प्रा. विंदा भुस्कुटे, ॲड. मीनल इनामदार, वैद्य वैष्णवी जोशी, समुपदेशक समता डहाणूकर, महिला तक्रार निवारण कक्षाच्या समुपदेशक ॲड. सीमा कुलकर्णी, स्मिता बागवे सहभागी झाले होते.

यापूर्वीच्या काळात लग्न जुळताना, पार पाडताना नेहमीचे रितीरिवाज केले जात होते. काही वेळा दोन्हीकडील कुटुंबीयांनी मुलगी आणि तिच्या सोबत श्रीफळाचा स्वीकार करून मुलगी पदरात घेतली आहे. इतके सामंजस्य यापूर्वी दाखविले जात होते. या सगळ्या मुळाशी घरातून होणारा नैतिक मुल्यांचा संस्कार खूप महत्वाचा आहे. आताही हा संस्कार आहे. पण आता समाज माध्यमी वेगवान हालचाली, प्रसिध्दीलोलुपतेमुळे प्रत्येक गोष्टीचा इव्हेन्ट करण्याची सवय समाजाला लागली आहे. या गर्तेत लग्न सोहळेही अडकले आहेत, अशी चिंता यावेळी जाणकारांनी व्यक्त केली.

लग्न आणि इतर धार्मिक कार्यात शिरलेल्या अनिष्ट प्रथा रोखायच्या असतील तर पालकांनी पहिले आपल्या मुलांमध्ये नैतिक मुल्याचे रोपण करणे खूप गरजेचे आहे. हा संस्कार प्रभावीपणे तगून राहिला तर नक्कीच लग्नामधील उधळपट्टी करणाऱ्या अनिष्ट प्रथा बंद होतील, असा निष्कर्ष यावेळी काढण्यात आला. लग्न झाल्यानंतर पती, पत्नी आपला संसार करत असतात. अशा वेळेत मुलीच्या आईने या संसारात आपला वाढता हस्तक्षेप ठेवला तर संसाराचे गणित बिघडते. हा हस्तक्षेप विवाहानंतर कमी होणे आवश्यक आहे.

समाजातील आमचे स्थान काय असा विचार करून काही कुटुंब बडेजावपणा करत विवाह सोहळे करतात. या स्पर्धेत लग्न संस्कार पूर्णपणे विरून जातो. हे समाजासाठी घातक आहे. मोबाईल हा हल्ली घटस्फोटाचे मोठे कारण ठरत आहे. एक साधन म्हणून मोबाईल ठीक, पण त्याचा अलीकडच्या काळातील अतिरेकी वापर पती, पत्नीमध्ये वितुष्ट निर्माण करण्यास कारणीभूत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

लग्नाच्यावेळी करण्यात आलेल्या अवाजवी मागण्या पूर्ण झाल्या नाहीत की लग्नानंतर त्या पूर्ततेसाठी विवाहितेचा छळवाद सासरकडून केला जातो. त्यामधून हागवणे कुटुंबीयांसारख्या घटना घडतात. याचा समाजाने विचार करणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगरी समाजातील लग्नांमध्ये होत असलेली उधळपट्टी आणि ती रोखण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती कोमासकर यांनी दिली. या कार्यक्रमाला ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरातील विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. कायदेशीर सल्लागार ॲड. पूजा ढोक यावेळी उपस्थित होत्या. सुनिती रायकर, सई बने, ॲड. तृप्ती पाटील, संगीता पाखले, पूजा तोतला, लीना मॅथ्यू यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. नेत्रा फडके यांनी सूत्रसंचालन केले.