डोंबिवली – टोईंग व्हॅनमुळे शहरातील रस्त्यांवर अवैध पध्दतीने उभी करण्यात आलेली वाहने उचलली जातात. त्यामुळे रस्ते मार्गातील वाहनांचा मार्ग मोकळा होतो. डोंबिवली आठ महिन्यानंतर सुरू झालेल्या टोईंग व्हॅनमुळे आता रस्तोरस्ती वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. टोईंग व्हॅन शहरात फिरवताना झटपट रस्त्यावरची अवैध वाहने उचला. अन्यथा, ही व्हॅन फिरवू नका, अशा सूचना डोंबिवलीतील नागरिकांकडून टोईंग व्हॅनवरील चालक, वाहतूक पोलिस नियंत्रकाला करण्यात येत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील टोईंग व्हॅन काही तक्रारींमुळे मागील आठ महिन्यांपासून बंद होत्या. डोंबिवली, कल्याणमधील टोईंग व्हॅन गेल्या आठवड्यापासून सुरू करण्यात आल्या आहेत. यापूर्वी टोईंग व्हॅनच्या माध्यमातून रस्त्यावर अवैधपणे, वाहतुकीला अडथळा होईल, वाहनतळ सोडून उभी केलेली वाहने झटपट उचलली जात होती. त्यामुळे टोईंग व्हॅनमुळे रस्ता कोंडी मुक्त होण्यास मदत होत होती.
आता नव्या नियमाप्रमाणे टोईंगवरील वाहतूक हवालदाराने, कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर अवैधपणे, वाहनतळ सोडून उभ्या केलेल्या वाहनाला ऑनलाईन माध्यमातून जागीच दंड करायचा, दंडात्मक चलनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ते वाहन उचलून टोईंग व्हॅन चालकाने जप्तीच्या वाहनतळावर न्यायचे आहे. रस्त्यावर अवैधपणे उभ्या असलेल्या एका दुचाकी, चारचाकी वाहनाला ऑनलाईन माध्यमातून (पाॅज सयंत्र) दंड करण्यासाठी वाहतूक हवालदार किंवा टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्याला चार ते पाच मिनिट लागतात. तेवढ्या कालावधीत टोईंग व्हॅन रस्त्यावर उभी राहिल्याने या वाहनाच्या मागे पुढे वाहनांचा रांगा लागतात, असे तक्रारदार नागरिकांनी सांगितले.
घाईत असलेल्या अनेक वाहन चालकांना टोईंग व्हॅनमुळे वाहतूक कोंडी झाल्याचे समजल्यावर तो वाहनातून उतरून थेट टोईंग व्हॅनवरील वाहतूक हवालदार, कर्मचारी, चालक यांच्याशी हुज्जत घालतो. हे प्रकार गेल्या मागील तीन दिवसांपासून डोंबिवलीत वाढले आहेत. अवैधपणे रस्त्यांवर उभ्या केलेल्या वाहनांवर ऑनलाईन दंडाची कारवाई करताना आता वाहन चालक, प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने टोईंग व्हॅनवरील कर्मचारी त्रस्त आहेत. अवैधपणे उभ्या केलेल्या वाहनाला जागीच ऑनलाईन माध्यमातून दंड करून मगच ते वाहन उचलण्याच्या टोईंग व्हॅन चालकांना वाहतूक विभागाच्या वरिष्ठांच्या सूचना आहेत. त्यामुळे या आदेशाचे उल्लंघन टोईंग व्हॅन चालकांना करता येत नाही, असे समजते.
डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागातील रस्ते अरूंद आहेत. त्यामुळे टोईंग व्हॅन कारवाईसाठी रस्त्यावर उभी राहिली की रस्त्यावर दोन्ही बाजुने कोंडी होती. आता शाळा सुरू झाल्या आहेत. शाळांच्या बसना या कोंडीचा फटका बसत असल्याच्या तक्रारी आहेत. वाहतूक विभागाने यापूर्वीसारखेच अवैधपणे उभे केलेले वाहन रस्त्यावरून उचलून नेऊन मग त्यांवर जप्ती वाहनतळावर त्या वाहनावर दंड करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.