डोंबिवली – डोंबिवलीत सोमवारी सकाळी रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन वेगळ्या घटनांंमध्ये दोन ज्येष्ठ नागरिक महिलांना दोन भुरट्या चोरट्यांनी अडवून त्यांच्या जवळील सुमारे दीड लाखाहून अधिक किमतीचा सोन्याचा ऐवज लुटला आहे. एकाच दिवशी एकाच भागात या घटना घडल्याने दोन्ही घटनांमधील भुरटे चोर एकच असावेत असा पोलिसांना संशय आहे.
रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकुर्ली खंबाळपाडा ९० फुटी रस्ता भागात राहणाऱ्या सुलभा चौधरी (६२) सोमवारी सकाळी साडे सात वाजता आपल्या दोन मैत्रिणी लता महाजन, शुभांगी भंगाळे यांच्या सोबत ९० फुटी रस्त्यावरील म्हसोबा चौक येथून बंदिश पॅलेस हाॅटेल दिशेने पायी जात होत्या.
दावत हाॅटेल समोरून या तिघीजणी जात होत्या. त्यावेळी समोरून एक मोटार सायकल आली. त्या दुचाकीवर दोन जण बसले होते. ते पुढे जातील असे वाटले असतानाच दुचाकी अचानक या तिन्ही पादचारी महिलांच्या अंगावर आली. यावेळी दुचाकी स्वाराच्या पाठीमागे बसलेल्या चोरट्याने सुलभा चौधरी यांच्या मानेवर जोराने थाप मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. त्यांनी पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकाराने या तिन्ही महिला घाबरल्या. सुलभा यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरून नेल्याने त्यांनी चोर म्हणून ओरडा केला, पण तोपर्यंत भुरटे पसार झाले होते. ३५ ते ४० वर्षाचे हे चोरटे होते.
दुसऱ्या एका घटनेत, सोमवारी सकाळी साडे दहा वाजता डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर रस्ता भागात राहणाऱ्या हर्षला सोनवटकर (६३) या एका बँकेत गेल्या. तेथून त्या टाटा लाईनखालील स्वामींचे घर येथे स्वामी समर्थ मठातून दर्शन घेऊन पायी घरी चालल्या होत्या. त्यांना वाटेत ३५ वर्षाचे दोन इसम आडवे आले. त्यांनी तक्रारदार हर्षला सोनवटकर यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ, हातामधील अंगठी काढण्यास सांगून ती पिशवीत ठेवण्यास सांगितले.
दोन्ही भुरट्यांनी हर्षला यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखी करून त्यांच्या पिशवीतील एक लाख रूपये किमतीचा सोन्याचा ऐवज काढून पळून गेले. हर्षला यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक नरळे याप्रकरणाचा तपास करत आहेत.
मागील काही दिवसांपासून ९० फुटी रस्ता भागात बंद असलेल्या भुरट्या चोऱ्या पुन्हा वाढू लागल्याने पोलिसांनी या भागातील गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सकाळच्या वेळेत नागरिक ९० फुटी रस्ता भागात फिरण्यासाठी येतात.