डोंबिवली – डोंबिवली पूर्वेत कोपर उड्डाण पुलाजवळ बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान एका पादचारी महिलेला एका इसमाने जोरदार धक्का देऊन जमिनीवर ढकलून दिले. तिच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून बाजुच्या रेल्वे मार्गातून चोरटा पळून गेला.

या महिलेने काही वेळ चोर ओरडत इसमाचा पाठलाग केला. चोरट्याने रेल्वे मार्गातून कोपर रेल्वे स्थानक दिशेने पळत जाऊन डोंबिवली पूर्व भागातून तो पसार झाला. या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज खेचताना चोरट्याने जोराने थाप मारली. त्यामुळे महिलेच्या मानेला फटका बसला असून नखांनी ओरबडल्याने जखम झाली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी या महिलेने तक्रार केली आहे.

डोंबिवली पूर्वेतील कोपर उड्डाण पूल भागातील कोपर गाव भागात गौरी म्हस्के या महिला राहतात. त्या नोकरी करतात. बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार महिला कोपर उड्डाण पूल भागातून पायी चालल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या समोरून एक इसम गेला. या इसमाने जाताना तक्रारदार महिलेच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र आहे हे पाहिले. संबंधित इसम चोरटा आहे असे तक्रारदाराला वाटले नाही. इसम पुढे निघून गेला असेल असे गौरी म्हस्के यांना वाटले. पण त्या इसमाने पुढे जाऊन पुन्हा माघारी येऊन बेसावध असलेल्या तक्रारदार महिलेच्या गळ्यावर पाठीमागून येऊन जोराने हाताची थाप मारली. आपल्या गळ्यावर हात मारून आपले मंगळसूत्र हिसकावले जात आहे याची जाणीव होताच, महिलेने मंगळसूत्र घट्ट पकडून ठेवले. चोरट्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला.

महिला ऐकत नाही लक्षात आल्यावर चोरट्याने तक्रारदार महिलेला जोराने जमिनीवर ढकलून दिले. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. महिलेने तात्काळ उठून त्या चोरट्याचा चोर ओरडत पाठलाग केला. चोरट्याने डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे मार्गात उडी मारून रेल्वे मार्गातून तो कोपर रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळत गेला. तेथून तो डोंबिवली पूर्व भागात पळून गेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या महिलेच्या मानेला जखम झाली आहे. दोन दिवसापूर्वी ठाकुर्ली ९० फुटी रस्ता, टाटा लाईनखाली दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लांबविला होता. त्यामुळे डोंबिवलीत अनेक महिन्यांनी पुन्हा भुरटे चोर सक्रिय झाले आहेत. विष्णुनगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. डोंबिवली परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये रहिवास असल्याची चर्चा आहे.