कल्याण – डोंबिवलीजवळील ठाकुर्ली खंबाळपाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे आईसह गेलेल्या साडे चार वर्ष वयाच्या प्राणवी विक्की भोईर (४) या बालिकेला आणि तिची मावशी श्रृती अनिल ठाकूर (२४) यांना रविवारी रात्री झोपेत असताना मण्यार जातीचा विषारी साप चावला. त्यांना तातडीने अधिकच्या उपचारासाठी कुटुंबीयांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे दोघींवर आवश्यक उपचार न झाल्याने प्राणवीचा अन्य रुग्णालयात स्थलांतरित करत असताना रुग्णालयाच्या प्रवेशव्दारात मृत्यू झाला. तर, श्रृती यांचा उपचारा दरम्यान मंगळवारी मृत्यू झाला.

या सर्व घटनेला शास्त्रीनगर रुग्णालयातील उपचारी डाॅक्टर, आरोग्य विभागाचे नियंत्रक अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी करत या दोन्ही मृतांच्या नातेवाईकांनी आधारवाडी येथील आरोग्य विभागाच्या प्रमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ला यांना फैलावर घेत त्यांच्या दालनात ठिय्या मांडला आहे. सदोष मनुष्य वधाचा गु्न्हा दाखल केल्या शिवाय आम्ही हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.

मागील सहा महिन्यापूर्वी एक गर्भवती महिलेच्या मृत्युमुळे पालिकेचे शास्त्रीनगर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता एक बालिका, एका महिलेचा शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने हे रुग्णालय पु्न्हा चर्चेत आले आहे.

काय घडले

डोंबिवली जवळील आजदे गावात राहणारे मंडप सजावट व्यावसायिक विक्की भोईर यांची पत्नी मुलगी प्राणवी (साडे चार वर्ष) खंबाळपाडा येथे माहेरी आली होती. रविवारी रात्री प्राणवी आपली मावशी श्रृती अनिल भोईर (२४) हिच्या जवळ घरात झोपली होती. घरातील विजेचे दिवे बंद होते. मध्यरात्रीच्या सुमारास मण्यार (चूड) जातीचा विषारी साप प्राणवीला झोपेत चावला. दंश होताच ती मोठ्याने रडू लागली. कुटुंबीय जागे झाले. त्याचवेळी श्रृती यांना आपणासही काही चावल्याचे जाणवले म्हणून बिछान्यात एक विषारी साप आढळला. सापाने दंश केल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबीयांनी दोघींना तातडीने पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात तत्पर उपचार मिळतील म्हणून आणले. तेथे डाॅक्टरांनी तपासून बालिका, महिलेची तब्येत ठिक आहे असे सांगून सर्प दंश प्रतिबंधक उपचार सुरू केले.

एक तासानंतर प्राणवीची तब्येत खालावू लागली. तिला कळव्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात हलविण्याच्या सूचना डाॅक्टरांनी केल्या. परंतु, प्राणवीला शास्त्रीनगर रुग्णालयातून रुग्णवाहिकेच्या दिशेने नेले जात असताना तिने रुग्णालय प्रवेशव्दाराजवळ प्राण सोडले. प्राणवीला कळवा येथे नेण्यासाठी पालिकेने सोबत डाॅक्टर, एक तास कार्डिआक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. खासगी वाहनातून तिला नेण्यात आले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयातील या नियमितच्या गोंधळाला कंटाळुन काही डाॅक्टरांनी पालिका मुख्यालयातील खुर्ची पटकावली आहे. पाट्याटाकू कर्मचारीही या रुग्णालयात सेवेत आहे.

विषारी साप चावलेली बालिका, महिला शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल होताच, त्यांच्यावर आवश्यक तत्पर उपचार सुरू करण्यात आले. बालिकेची तब्येत बिघडल्यामुळे तिला कळवा येथे अधिक उपचारासाठी खासगी रुग्णवाहिकेतून वीस मिनिटात पाठविण्यात आले. उपचार, रुग्णवाहिकेचे सर्व कागदोपत्री नोंद रुग्णालयात उपलब्ध आहे. – डाॅ. योगेश चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, शास्त्रीनगर रुग्णालय.