डोंबिवली – खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील दावडी गावातील एका तरूणाचा बुधवारी दुपारी खदानीत बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी सात तासाच्या प्रयत्नानंतर तरूणाचा मृतदेह खदानीतून बाहेर काढला.

किरण शिंदे (२०) असे या तरूणाचे नाव आहे. पावसाळा सुरू झाल्याने डोंगर, शेत शिवारात खेकडे, चिंबोऱ्या यांचा वावर वाढला आहे. हे जलचर प्राणी पकडण्यासाठी बुधवारी दुपारी दावडी गावातील किरण शिंदे आणि त्याचे साथीदार दावडी गाव परिसरात गेले होते. गाव हद्दीत दगडाची जुनी खदान आहे. या खदानीला दगडाच्या कपारी आहेत. एका खदानीच्या किनारी असलेल्या बिळांमधून किरण शिंदे खेकडे पकडण्याचा प्रयत्न करत होता.

पावसामुळे खदानीचा वरचा माती, खडकाचा भाग निसरडा झाला आहे. किरण खेकडा पकडत असताना अचानक त्याचा तोल जाऊन खदानीत पडला. खदान पाण्याने भरली आहे. या खदानीला आतून दगडांच्या खोल कपारी आहेत. किरणला पोहता येत नसल्याने तो बचावासाठी ओरडा करू लागला. त्याच्या साथीदारांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे ते विविध प्रकारचे प्रयत्न करून किरणच्या बचावासाठी प्रयत्न करू लागले. पण त्यांचे प्रयत्न असफल झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणाची माहिती किरणच्या नातेवाईकांनी तातडीने मानपाडा पोलीस, अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन पथक घटनास्थळी आले. खदानीत त्यांनी विविध प्रकारचे प्रयत्न करून किरणला शोधण्याचा प्रयत्न केला. किरण खदानीतील एका कपारीत अडकला होता. अखेर सात तासाच्या अथक प्रयत्नानंतर तुडुंब भरलेल्या या खदानीतील एका कपारीतून किरणचा मृतदेह जवानांनी बाहेर काढला. डोंबिवली अग्निशमन विभागाचे अधिकारी भाऊसाहेब पगार यांच्या नेतृत्वाखाली ही शोध मोहीम राबविण्यात आली.