फरार आरोपींमध्ये विकी गोस्वामीचे नाव
नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इफ्रेडीन पावडरच्या तस्करीप्रकरणी ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या आठपैकी चार आरोपींविरोधात ठाणे न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुमारे पावणे तीनशे ते चारशे पानांचे हे आरोपपत्र असून, त्यामध्ये तस्करीसंबंधीचे पुरावे, लॅबचा अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब आदींचा समावेश आहे. आरोपपत्रात फरारी आरोपींमध्ये कुख्यात ड्रगमाफिया विकी गोस्वामीचे नाव आहे. उर्वरित चारजणांविरोधात तपास अद्याप पूर्ण झालेला नसल्यामुळे त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने इफ्रेडीन पावडर तस्करीचे रॅकेट उघडकीस आणून आठ आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांना ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. आठपैकी चार आरोपींविरोधातील तपास पोलिसांनी पूर्ण केला असून, त्यांच्याविरोधात ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये सागर पोवळे, मयूर सुगदरे, राजें्रद डिमरी आणि धानेश्वर स्वामी या चौघांचा समावेश आहे. या आरोपपत्रामध्ये तीन आरोपी फरार दाखविण्यात आले असून त्यात किशोर राठोड, सुशीलकुमार आणि कुख्यात ड्रगमाफिया विकी गोस्वामी यांची नावे आहेत. आठपैकी उर्वरित चार आरोपींविरोधातील तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यांच्याविरोधातही लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.