कल्याण: कल्याण पश्चिमेत गोविंदवाडी भागात गुजराती मंदिर परिसरात राहणाऱ्या एका मांस विक्रेत्याने जनावरांंची कत्तल करण्याचा शासनाचा कोणताही परवाना नसताना एक बंदिस्त खोलीत गोवंशाच्या जातीच्या प्राण्याची मांंस विक्रीसाठी निर्दयपणे हत्या केली. याच खोलीत कत्तल करण्यासाठी आणखी दोन प्राणी बंदिस्त केलेले बाजारपेठ पोलिसांना आढळून आले. प्राण्याची क्रूरपणे हत्या केल्याबद्दल आणि दोन प्राण्यांना अटकाव केल्याबद्दल या मांस विक्रेत्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वसुल जेनुलआबेदिन गुझर (२९) असे गुन्हा दाखल मांस विक्रेत्याचे नाव आहे. ते रेतीबंदर कल्याण येथे राहतात. गोविंदवाडी बैलबाजार भागात एका बंदिस्त खोलीत एक इसम प्राण्यांची कत्तल करून त्याचे मांस विक्री करणार आहे, अशी गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदवाडी भागात माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी त्यांना तेथे एक खोलीत एका प्राण्याची क्रूरपणे हत्या केली असल्याचे आढळले. या प्राण्याचे मांस तो विक्री करणार होता. या खोलीत दोन अन्य प्राणी कत्तल करण्यासाठी बांधून ठेवण्यात आले होते. हा प्रकार कोणाला कळू नये यासाठी वसुलने विशेष खबरदारी घेतली होती.

गुप्तपणे हा प्रकार सुरू होता.हे प्राणी आपण बैलबाजारातून खरेदी केले असल्याची माहिती मांस विक्रेता वसुल गुझर यांनी पोलिसांना दिली. जनावरांची कत्तल आणि मांस विक्रीचा शासन, कल्याण डोंबिवली पालिकेचा परवाना आपल्याकडे आहे का, अशी विचारणा पोलिसांनी वसुल गुझर यांच्याकडे केली. त्यावेळी त्यांनी अशाप्रकारचा परवाना नसल्याचे पोलिसांना सांगितले. वसुल गुझर यांनी धारदार शस्त्राने अतिशय क्रूरपणे प्राण्याची हत्या केल्याने पोलिसांनी त्यांच्या विरुध्द प्राण्यांचे संरक्षण कायद्याने गु्न्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक तुळशीराम राठोड, हवालदार पवार, शेळके, सोनार यांच्या पथकाने ही कारवाई केली.