कल्याण : Pandharpur Ashadhi Wari 2023 देवशयनी आषाढी एकदशी निमित्त येथील बी. के. बिर्ला महाविद्यालय आणि या समुहाशी संलग्न संस्थांतर्फे गुरुवारी सकाळी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ज्ञान दिंडी काढण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक, कामगार, अधिकारी, पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी या उपक्रमात सहभागी झाले होते.

केंद्र, राज्य शासनातर्फे मागील काही वर्षापासून शहर स्वच्छता आणि पर्यावरण जतनाचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे शहरात मागील तीन वर्षापासून आक्रमकपणे शहर स्वच्छता कार्यक्रम राबविला जात आहे. नागरिकांना स्वच्छता आणि पर्यावरणाचे महत्व कळावे म्हणून ज्ञान दिंडीच्या माध्यमातून बिर्ला महाविद्यालय ते शहाड येथील विठ्ठल रुक्मिणीबाई मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली.

हेही वाचा >>> “मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी की..”, जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांवर उपरोधिक टीका

वारकऱ्याच्या पेहरावात विद्यार्थी, शिक्षक हातात विठ्ठल भक्तीची पताका घेऊन सहभागी झाले होते. महाविद्यालय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ओ. आर. चितलांगे, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, शिक्षण संचालक डाॅ. नरेशचंद्र, प्राचार्य डाॅ. अविनाश पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी पूजन करण्यात आले. भजन गाणारा एक गट, योग पथक, ढोल-ताशा, लेझीम पथक अशा गजरात बिर्ला महाविद्यालय येथून दिंडीला प्रारंभ झाला.

हेही वाचा >>> बेकायदा इमारती, चाळींमुळे कल्याण-डोंबिवली तुंबली

सुशोभित रथावर देखणी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती ठेवण्यात आली होती. सोबत सजविलेल्या पालख्या खांद्यावर घेऊन वाजत गाजत विद्यार्थी, शिक्षक स्वच्छता, पर्यावरणाचा संदेश देत होते. पावसाच्या सरी अंगावर घेत विठ्ठल भक्तीमध्ये विद्यार्थी रमून गेले होते. दिंडीमध्ये माजी आ. नरेंद्र पवार, आ. कुमार आयलानी, आ. गणपत गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव, व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुबोध दवे, सेंच्युरी रेयाॅन युनिट प्रमुख दिग्विजय पांडे सहभागी झाले होते. बिर्ला रात्र महाविद्यालय, सेंच्युरी रेयाॅन, बिर्ला पब्लिक शाळा, सेंच्युरी रेयाॅन हायस्कूल यांचा उपक्रमात सक्रिय सहभाग होता. याशिवाय कल्याण परिसरातील शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहाड येथे विठ्ठल मंदिर व्यवस्थापनातर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पत्नी स्मिता शिनगारे यांच्या हस्ते माऊली विठ्ठलावर अभिषेक करण्यात आला. शैक्षणिक कर्तव्याबरोबर सामाजिक भान म्हणून सेंच्युरी रेयाॅनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओ. आर. चितलांगे यांच्या संकल्पनेतून मागील सात वर्षापासून ही ज्ञान दिंडी आषाढी एकादशीच्या दिवशी काढली जाते.