लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांचे विचार, कार्य, त्यांची देशाला असलेली देणगी याविषयी शालेय जीवनापासून मुलांना माहिती मिळावी. या विचारातून येथील वाचन कट्ट्यातर्फे शालेय मुलांसाठी राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांच्या सामुदायिक वाचनाचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित केला होता. या उपक्रमात शाळकरी मुले उत्साहाने सहभागी झाली होती.

वाचन संस्कृती वाढावी, जोपासण्यासाठी कल्याण मधील विशाल कदम काही वर्षापासून सार्वजनिक ठिकाणी बाग, उद्याने, सार्वजनिक कार्यक्रम याठिकाणी वाचनाचे उपक्रम राबवित आहेत. नागरिक, शाळकरी मुले या उपक्रमात सहभागी होतात. डाॅ. आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून केवळ भाषण, समारंभापुरता हा कार्यक्रम मर्यादित न ठेवता आजच्या दिवशी शाळकरी मुलांना आंबेडकरांच्या जीवनावरील पुस्तके वाचन करण्यास द्यावीत. वाचन केलेल्या विषयांवरुन मुलांना बोलते केले तर खऱ्या अर्थाने ती डाॅ. बाबासाहेबांना मानवंदना ठरेल या विचारातून कल्याण मधील विविध भागातील शाळकरी मुले शुक्रवारी सकाळी कल्याण पश्चिमेतील वायलेनगर भागातील वाचन कट्ट्यावर उपस्थित झाली.

हेही वाचा…. टिटवाळ्यात रस्त्यावरील बेवारस वाहनांवर जप्तीची कारवाई

या मुलांना वाचन कट्ट्यातर्फे बाबासाहेबांच्या जीवनावरील पुस्तके वाचनासाठी देण्यात आली. काही क्षणात मुले पुस्तकांमध्ये गढून गेली. दोन तास पुस्तकाचे वाचन झाल्यावर उपस्थितांनी मुलांशी संवाद साधला. त्यांनी वाचलेल्या विषयावर मनोगत व्यक्त करण्यास मुलांना सांगितले. देश, विदेशातील बाबासाहेबांचे कार्य, लेखक, साहित्यिक, विचारवंत, अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी बाबासाहेबांचे कार्य याविषयी मुलांनी मनोगत व्यक्त केली. या उपक्रमात काही पालक सहभागी झाले होते.

हेही वाचा…. कल्याणमध्ये उच्चशिक्षित तरुणांचा दारु पिऊन रस्त्यावर धिंगाणा

वाचन कट्टा, सजग चॅरिटेबल ट्रस्ट यांचा या उपक्रमात महत्वाचा वाटा होता. बाबासाहेबांच्या जीवनावरील शेकडो पुस्तके वाचन कट्ट्याने जमा केली आहेत. या पुस्तकांसाठी आंबेडकर व्हिजन संस्थेने वायलेनगर भागात जागा उपलब्ध करुन दिली आहे. या भागात आंबेडकरांच्या जीवनावरील पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या अनोख्या कार्यक्रमाने परिसरातील रहिवासी, मुलांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचन कट्ट्याचे संस्थापक विशाल कदम, आंबेडकर व्हिजन संस्थेचे सुदेष्णा कदम, वसंत कदम, अनिला खापरे, सजग संस्थेच्या सजिता, अनुजा लिमये यांनी मेहनत घेतली.