कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत शासनाच्या ३५० कोटीच्या निधीतून विविध भागांमध्ये प्रशासनाने सीमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. ही कामे विकास आराखड्यातील रस्त्यांप्रमाणे न करता मनमानी पध्दतीने केली जात आहेत. या निकृष्ट रस्ते कामांमुळे कल्याण, डोंबिवलीतील रस्ते भविष्यात वाहतूक कोंडीने गजबजून जातील. त्यामुळे या काँक्रीट रस्ते कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांची मंगळवारी भेट घेऊन केली आहे.

शहरातील रस्ते हे विकास आराखड्यातील १५ मीटर, १८ मीटर, २० मीटर रस्त्याप्रमाणे होणे आवश्यक आहे. कल्याण, डोंबिवली शहरे वाढत आहेत. त्यामुळे वाढत्या वस्तीचा विचार करून या रस्त्यांचे रुंदीकरण आणि त्यानंतर सीमेंट काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. ठेकेदार मनमानी पध्दतीने रस्त्यांचे रुंदीकरण न करताच आहे त्या अरूंद रस्त्याचे काँक्रिटीकरण करत आहेत. या मनमानीमुळे रस्त्यालगतची गटारे उंंच आणि रस्ते खाली असे चढ, उताराचे, खडबडीत रस्ते नवीन सिमेंट रस्ते कामांच्या ठिकाणी पाहण्यास मिळत आहेत.

अनेक ठिकाणी निविदा न काढताच रस्ते कामे हाती घेण्यात आली आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजुची स्वतंत्र निविदा आणि दुसऱ्या बाजुची स्वतंत्र निविदा अशा पध्दतीने रस्ते कामे करून रस्ते कामांची देयक काढण्यात येत आहेत. यामध्ये काही पालिका अधिकारी सामील असण्याची शक्यता आहे. या रस्ते कामाविषयी ठेकेदार पालिका अभियंत्यांना दाद देत नाहीत. त्यामुळे अभियंत्यांची कोंडी होत आहे. या सगळ्या प्रकाराची माहिती घेऊन कल्याण, डोंबिवलीतील नव्याने सुरू असलेले काँक्रीट रस्ते काम सुस्थितीत होतील यासाठी पुढाकार घ्यावा आणि या कामात होत असलेल्या गैरप्रकारची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.

२७ गावांना एमआयडीसीकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने गावांंमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती आहे. गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी दहा वर्षापासून अमृत योजनेचे काम सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. या कामाला गती देण्याची मागणी म्हात्रे यांनी केली आहे.

पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात मोठा गोंधळ आहे. याठिकाणी कोणाचे नियंत्रण नसल्याने रुग्णांना जीव गमवावा लागतो. मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकावरील उड्डाण पूल, स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामे लवकर मार्गी लावावीत. आरोग्य, शिक्षण विभागांमध्ये गोंधळ आहे. वाढत्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण आहेत. याविषयी प्रभावी उपाय योजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी केली आहे. आयुक्तांची भेट घेताना जिल्हा संघटक तात्या माने, उपजिल्हाप्रमुख राहुल म्हात्रे, तालुकाप्रमुख मुकेश पाटील, शहरप्रमुख अभिजीत सावंत, प्रकाश तेलगोटे, सचिन जोशी, सदाशिव गायकर, युवा पदाधिकारी आदित्य पाटील, ऋतुनील पावस्कर उपस्थित होते.