कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागात काम करणारे सुमारे ६०० कामगार गुरूवारी सकाळपासून संपावर होते. त्यामुळे डोंबिवली, कल्याण शहराच्या विविध भागात कचऱ्याचे ढीग साचले होते. सोसायट्यांसमोरील कचऱ्याच्या पेट्या वेळेत न उचलल्याने सोसायटी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना नसताना अचानक पालिकेतील कंत्राटी सफाई कामगार संपावर गेले. त्यामुळे कचरा उचलणाऱ्या खासगी कामगार, सोसायटी चालकांची तारांबळ उडाली. पालिका सेवेत कायम करा, वेळेत वेतन द्या, वेतन वाढवा, अशा मागण्या कामगारांच्या आहेत.

मागील अनेक वर्षांपासून पालिकेत काम करत असल्याने कल्याण डोंबिवली पालिकेत कायम होऊ, अशी अपेक्षा या कामगारांना आहे. त्यामुळे हे कामगार नियमितपणे पालिका हद्दीतील कचरा उचलण्याचे काम करतात. घंटागाड्यांचे सर्वच चालक कंत्राटी आहेत. पालिका हद्दीत सकाळपासून, रात्री फिरणाऱ्या घंटागाडीच्या माध्यमातून कचरा उचलण्याचे काम हे कंत्राटी कामगार करतात. प्रत्येक प्रभागातील घंटागाड्यांच्या नियोजनाप्रमाणे सकाळच्या वेळेत सोसायट्यांमधील कचरा उचलला जातो. गुरूवारी नियमित वेळेत येणारी घंटागाडी न आल्याने सोसायटी चालकांना कचऱ्याची विल्हेवाट लावायची कोठे, असा प्रश्न पडला.

हेही वाचा : ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला, दोन वाहनांचे नुकसान तर एक कामगार जखमी

सोसायटीच्या प्रवेशव्दारात कचरा पेटी ठेवली तर भटकी कुत्री पेटी जमिनीवर पाडून कचरा विखुरन टाकतात. अनेक रहिवासी, सोसायटी चालकांनी सोसायटीच्या आवारात कचरा नको म्हणून सार्वजनिक ठिकाणच्या जागेवर कचरा नेऊन टाकला. सकाळपासून कामगारांचा संप सुरू झाल्याने एकही घंटागाडी, कचरा वाहू गाडी पालिकेच्या वाहन नियंत्रण केंद्रातून बाहेर पडली नाही. प्रशासनाने पालिकेच्या कायम कामगारांना तातडीने कामावर बोलावून घंटागाड्या, कचरा वाहू वाहने केंद्राच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कामगारांनी ती वाहने प्रवेशव्दारावर अडवली. खंबाळपाडा येथील कचरा वाहू वाहन केंद्रांच्या बाहेर कंत्राटी कामगारांनी निदर्शने केली.

हेही वाचा : रेल्वे मार्गावर जिना नसल्याने डोंबिवलीतील आयरे, देवीचापाडा येथील नागरिकांचा रेल्वे मार्गातून प्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंत्राटी कामगारांनी तातडीने कामावर हजर व्हावे यासाठी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील सकाळपासून प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. कंत्राटी कामगारांना सकारात्मक आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले. त्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून संपावर गेलेले कामगार दुपारी १२ वाजता कामावर हजर झाले. शहराच्या विविध भागात, नियोजित ठिकाणी जमा झालेला कचरा दिवसभरात उचलण्याच्या सूचना कामगार, घंटागाडी चालकांना देण्यात आल्या आहेत, असे उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितले. “सकाळपासून कंत्राटी कामगार संपावर होते. आता ते हजर झाले आहेत. कामगार, घंटागाड्या कचरा उचलण्यासाठी शहरात कार्यरत झाले आहेत. दिवसभरात सकाळपासून पडलेला सर्व कचरा उचलला जाईल.”, असे घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी म्हटले आहे.