कल्याण: कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागातील एका इंग्रजी शाळेत शाळेची मुख्याध्यापिका आणि व्यवस्थापन सदस्य हे अश्लील कृत्य करत असल्याची दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. शाळेसारख्या सरस्वतीच्या पवित्र मंदिरात असे अश्लील कृत्य करणाऱ्या या दोन्ही शाळा चालकांविरूध्द कठोर कारवाई करावी म्हणून शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आशा रसाळ यांनी पालकांच्या सहकार्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यासमोर शनिवारी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

या शाळेतील चालकांची गैरकृत्याची दृश्यचित्रफित पालकांच्या मोबाईलवर प्रसारित झाल्यावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपली मुले शिकत असलेल्या शाळेत असे गैरप्रकार सुरू असतील तर हे शाळा चालक विद्यार्थ्यांवर कोणते आदर्शवत संस्कार करतील, असा प्रश्न करत मागील पाच दिवसांपासून संतप्त पालकांनी शिवसेनेच्या पदाधिकारी आशा रसाळ यांच्या पुढाकाराने शाळे विरुध्द निदर्शने सुरू केली आहेत. हे गैरकृत्य करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि व्यवस्थापन सदस्य यांच्या विरुध्द गु्न्हा दाखल झाला पाहिजे, अशी जोरदार मागणी करत पालकांनी शनिवारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धडक दिली.

शिवसेना पदाधिकारी आशा रसाळ या पालकांचे नेतृत्व करत आहेत. अदखलपात्र गु्न्हा दाखल करून शाळा चालकांना पोलिसांनी पाठीशी घालू नये, अशी पालकांची मागणी आहे. या शाळेतील गैरकृत्याच्या अनेक भानगडी आहेत. त्या आपण वेळ येईल तेव्हा नक्कीच जाहीर करू, असे आशा रसाळ यांनी माध्यमांना सांगितले.

जोपर्यंत गैरकृत्य करणाऱ्या मुख्याध्यापिका आणि शाळा व्यवस्थापन सदस्या विरुध्द गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यासमोरून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका पालकांनी घेतली आहे. काटेमानिवली भागातून जोरदार घोषणा देत, हातात निषेधाचे फलक घेत पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा आणला. पोलीस ठाण्यासमोरील मोकळ्या जागेत बैठक मारून शाळे विरुध्द जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. अनेक शाळा चालकांनी या शाळेतील गैरकृत्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गैरप्रकाराविषयी संताप व्यक्त केला आहे. या शाळेच्या व्यवस्थापनावर काही लोकप्रतिनिधी सदस्य असल्याची चर्चा आहे.