कल्याण – काका, पडघा कुठे आहे, असे वाहतूक कोंडीत असताना दुचाकीवरील इसमांनी बाजुने जात असलेल्या दुचाकीवरील एका नागरिकाला विचारले. पडघा कोणत्या दिशेला आहे सांगितल्यानंतर काही क्षणात दुचाकी स्वारांनी नागरिकाच्या जवळ येऊन त्यांच्या मानेवर थाप मारून गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि दुचाकीवरून सुसाट वेगाने पळ काढला.
दुचाकीवर असलेल्या नागरिकाचे हात दुचाकीच्या दोन्ही हॅन्डलवर होते. तरीही त्यांनी चपळाईने मानेवर दुचाकीवरील चोरट्यांनी हात टाकताच आपली सोनसाखळी दाबून धरली आणि ती चोरटे हिसकावणार नाहीत याची काळजी घेतली. पण आक्रमक असलेल्या चोरट्यांनी मानेवर जोराने फटका मारून नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली.
या घटने प्रकरणी सुरेश नामदेव कारवे (५८) यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कारवे कल्याण पूर्वेतील ज्योतीनगर हरीओम कॉलनी परिसरातील सोसायटीत राहतात. गुरुवारी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान कल्याण पूर्वेतील म्हात्रे नाका भागातील सागर हाॅटेल भागात ही घटना घडली आहे. ४५ हजार रूपयांची सोन्याची साखळी चोरीला गेली आहे.
तक्रारदार सुरेश कारवे यांनी तक्रारीत म्हटले आहे, की मी माझ्या दुचाकीवरून कल्याण पूर्वेतील म्हात्रे नाका भागातून गुरूवारी संध्याकाळी जात होतो. म्हात्रे भागात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रस्त्यावरील सर्व बाजुचे वाहने जागोजागी थांंबली होती. आपणही या कोंडीत थांबलो होतो. त्याच वेळी आपल्या समोरून पल्सर दुचाकीवरून दोन पंचविस वर्षाचे इसम आले. ते पुढे जातील असे वाटले असतानाच ते आपल्या दुचाकीच्या जवळ येऊन थांबले. त्यांनी आपल्याकडे नजर मारली आणि आम्हाला पडघ्याला जायचे आहे. पडघा कुठे आहे अशी विचारणा केली.
त्यावेळी आपण त्यांना हाताने दिशा दाखवली. दिशा दाखवून झाल्यानंतर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या इसमाने आपल्या मानेवर जोराची थाप मारली. तक्षणी आपण दुचाकीच्या हॅन्डलवरचा हात काढला आणि मानेवर ठेवला. आपल्या गळयातील सोनसाखळी दुचाकीवरील दोन इसम हिसकावत आहेत याची जाणीव होताच, आपण मानेवर घट्ट हात दाबून ठेवला. इसमाने जोर लावत गळ्यातील सोनसाखळी खेचली. खेचल्यानंतर सोनसाखळी तुटली. त्या मधील काही भाग आपल्या हातात राहिला. उर्वरित भाग इसमाच्या हातात गेला.
सोनसाखळी हातात मिळताच बाजुला असलेले दुचाकीवरील दोन्ही २५ वर्षाचे तरूण सुसाट वेगाने शंभर फुटी रस्ता मलंग गड दिशेने दुचाकीवरून पळून गेले. या दोन्ही तरूणांनी आपली ओळख लपविण्यासाठी हेल्मेट, रेनकोट घातले होते, असे तक्रारीत म्हटले आहे.
साहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील याप्रकरणाचा तपास करत आहेत. दोन दिवसापूर्वी डोंबिवलीत आजदेगाव, ९० फुटी रस्ता भागात दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचा दोन लाखाचा ऐवज दुचाकीवरून आलेल्या भुरट्या चोरांनी चोरून नेला आहे. तशाच पध्दतीने हा प्रकार घडला आहे. त्यामुळे दुचाकीवरील भुरटे चोर पुन्हा शहरात सक्रिय झाले आहेत, अशी चर्चा आहे.