कल्याण : आपण हुक्का मेजवानी करणार आहोत, असा निरोप आपल्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मैत्रिणीला तिच्या चार मित्रांनी दिला. या मैत्रिणीला चार जणांनी एका मित्राच्या घरी नेले. तेथे तिच्याशी या चार जणांनी गैरवर्तणूक केल्याने अस्वस्थ झालेल्या या तरुणीने शुक्रवारी आपल्या राहत्या घरी नैराश्यातून आत्महत्या केली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार तरुणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्या अहवालानंतर या तरुणीवर चार जणांनी कोणते गैरकृत्य केले ते उघड होणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. कल्याण पश्चिमेत ही तरुणी कुटुंबासह राहत होती. शुक्रवारी ती घरात खूप अस्वस्थ होती. तिच्या भावाने तिला अस्वस्थ होण्याचे कारण विचारले. तिने माझ्या सोबत माझ्या चार मित्रांनी गैरवर्तणूक केली आहे आणि घरी काहीही न सांगण्यासाठी धमकावले आहे, असे ती म्हणाली.

हेही वाचा : कल्याणमध्ये एमडी तस्करी प्रकरणी दोन जणांसह नायजेरियन इसम अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बोलण्यानंतर भाऊ घराबाहेर पडला. तो काही वेळाने घरात परत आला तेव्हा बहिणीने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसले. या प्रकाराने कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार तरुणांविरुध्द पाॅक्सो, विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस निरीक्षक दीपाली वाघ या प्रकरणाचा तपास करत आहेत.