कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या मटण विक्री बंदीच्या आदेशाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी कल्याणमध्ये जय मल्हार या खाटिक समाजाच्या हॉटेलमध्ये येऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत मटणाच्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

जय मल्हार हॉटेल हे समर आणि अमर घोलप यांच्या मालकीचे हॉटेल आहे. खाटिक समाजाच्या हॉटेलमध्ये शिजवलेल्या मटणाचा आस्वाद घेऊन आम्ही पालिकेच्या आदेशाचा निषेध करतो, असा सर्वदूर संदेश जाण्यासाठी जय मल्हार हॉटेलची स्नेहभोजनासाठी निवड करण्यात आली, असे एका कार्यकर्त्याने सांगितले.

लहान मोठे प्राणी कापणारे कत्तलखाने बंद ठेवण्याचा शासनाचा सल्ला आहे. तो आदेश नाही. प्राणी शब्दामध्ये चार पायांचे प्राणी येतात. यात दोन पायांची कोंबडी प्राणी म्हणून कोठून आली. तो पक्षी आहे ना. प्राणी आणि पक्षी यांच्यातील फरक शासन अधिकाऱ्यांना कळत नसेल तर मग शासनाने याविषयाचे मार्गदर्शन घेण्यासाठी व्याकरणाचा शिक्षक मंत्री म्हणून नेमावा, असे डॉ. आव्हाड यांनी सांगितले.

३९ वर्षापूर्वीचा आदेश त्याची आता अंमलबजावणी. म्हणजे वरून आदेश आल्याशिवाय अशी अंमलबजावणी होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण, त्यामधून निवडणुका हेच या सरकारचे धोरण आहे. जाती, पाती आणि इतर सर्व वाद पेटवून झाले. त्यातून काही मिळाले नाही. म्हणून आता शाकाहरी मांसाहरी वाद पेटवून बघू .त्यातून हाती काय लागले तर बघू, असा हा या शासन सल्ल्याचा अर्थ आहे, असे आ. आव्हाड म्हणाले.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देश स्वातंत्र झाला. आज लोक सुट्टी असल्याने घराबाहेर पडतात. मांसाहरी जेवणाला पसंती देतात. आमच्याकडे स्वातंत्र्यदिनी मांसाहरी जेवणाला सरकारी कुलुप हा कोठला न्याय? हे प्रकार यापुढे खूप वाढणार आहेत. आत्ताच अशा शासन निर्णयांंकडून कडाडून विरोध केला पाहिजे, असे डॉ. आव्हाड यांनी सांगितले.

उत्तर कोरियात आठ प्रकारची रचना असलेले केस कापण्याचे तेथील अध्यक्षांचे आदेश आहेत. आपली वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने सुरू आहे. उद्या उत्तर कोरिया सारखा फतवा आपल्याकडे निघाला तर अजिबात आश्चर्य नको इतके घाणेरडे राजकारण आता सुरू आहे, असे डॉ. आव्हाड यांनी म्हणाले. इतर पालिकांनी असा आदेश काढला नाही. मग, कल्याण डोंबिवली पालिकेला हा आदेश काढण्याचा पान्हा का फुटला. पालिकेसमोर कार्यकर्ते आंदोलन करतील म्हणून त्यांना घरात पोलिसांनी स्थानबध्द केले. ही कोठली पोलिसांची जुलुमशाही. ही सगळी हुकुमशाहीची लक्षणे. ईव्हीएममध्ये हे लोक आता चोऱ्या करायला लागले आहेत. कालच्या न्यायालयाच्या निकालातून ते स्पष्ट झाले. ही हुकुमशाहीच्या दिशेने चाललेली व्यवस्था आहे, असे आमदार आव्हाड म्हणाले.

वसई विरार पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार फुटामागे बांधकामाचे पैसे घेत होते. वरच्या ‘आका’ शिवाय हा खालचा काका बिनधास्त उद्योग करणे शक्य नाही, अशी टीका आ. आव्हाड यांनी केली.