Navratri utsav 2025 (kalyan) ठाणे – महाराष्ट्रातील अनेक भागांत नवरात्रात महालक्ष्मी पूजन घरोघरी किंवा ठरलेल्या मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने केले जाते. मात्र कल्याण येथील श्री ब्राह्मण भगिनी श्री महालक्ष्मी मंडळाच्यावतीने आगळीवेगळी पूजा केली जाते. नवरात्रीत या मंडळात तांदळाच्या उकडीपासून देवीचा सुबक आणि रेखीव मुखवटा तयार केला जातो. या देवीला नऊवारी साडी, पारंपरिक दागदागिने, नथ, कुड्या आणि चंद्रकोर लावून आकर्षक सजवले जाते. ही पूजा केवळ महिलाच करतात. या मंडळाची ही परंपरा ८७ वर्षांपासून सुरू आहे.
नवरात्रोत्सव हा देवीच्या आराधनेचा पर्व मानला जातो. या दिवसांत देशभरात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महालक्ष्मी पूजनाची परंपरा आहे. मात्र कल्याण येथील श्री ब्राह्मण भगिनी श्री महालक्ष्मी मंडळाचा सोहळा हा विशेष ठरतो. चित्तपावन कोकणस्थ ब्राह्मण समाजात अष्टमीला महालक्ष्मी पूजनाची परंपरा आहे. विवाहानंतर पहिली पाच वर्षे घराघरांत ही पूजा केली जाते. ही पूजा केवळ घरातील महिलाच करतात.
सुमारे ८७ वर्षांपूर्वी कल्याणमधील ब्राह्मण भगिनींनी वेगळी वाट निवडली. घरोघरी पूजा करण्याऐवजी सर्वांनी मिळून सामूहिक पूजा करण्याचा निर्णय घेतला आणि याच धर्तीवर मंडळाची स्थापना झाली. पारनाका येथील श्री त्रिविक्रम मंदिर देवस्थानात या पूजेची सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून ही परंपरा अजूनही अखंड सुरू आहे. अगदी करोना काळातही २५-३० महिलांनी एकत्रित येत ही पूजा केली होती. यानंतर मंडळातील सभासदांची संख्या कालांतराने वाढत गेली. त्यामुळे सध्या ८० महिलांचा सहभाग आहे. मंडळाची स्थापना केल्यानंतर सुरूवातीला प्रत्येक जण घरूनच पूजेसाठी साहित्य आणत होते. त्यामुळे अल्प खर्चात प्रसाद आणि भोजनाची सोय व्हायची.
अशा पद्धतीने पूजा केली जाते
शारदीय नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी ही एक दिवसीय पूजा केली जाते. पूजेच्या दिवशी सर्व महिला एकत्रित येत तांदळाच्या उकडीपासून देवीचा मुखवटा तयार करतात. या मुखवट्याला आकर्षक डोळे काढले जातात. त्याचबरोबर पूजेच्या दिवशी सकाळी नदीकोळचे खडे (बराडे), दुर्वां आणि रेशीम धागा यांची देवी म्हणून प्रतीकात्मक पूजा केली जाते. यानंतर दुपारी देवीला नऊवारी साडी, पारंपरिक दागदागिने, नथ, कुड्या आणि चंद्रकोर लावून आकर्षक सजवले जाते. त्यानंतर पंचामृत पूजा, आरती आणि देवीची कहाणी वाचनानंतर मुलींच्या हाताला रेशमी धागा बांधण्याची प्रथा आहे. तसेच अध्यक्ष आणि यजमान मिळून देवीची आरती करतात. पाच फळांनी ओटी भरली जाते. सायंकाळी मातीच्या घागरीत धूप घेऊन त्यात फुंकर घालून खेळवण्याची खास प्रथा येथे जपली जाते.