कल्याण – कल्याण पश्चिमेतील आधारवाडी तुरूंग रस्त्यावरील विशाल भोईर चौकातील मोहन रिजन्सी संकुलातील मंदिरात बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी प्रवेश करून मंदिरातील दानपेटीमधील सुमारे वीस हजाराहून अधिक रकमेची चोरी केली आहे. याशिवाय याच सोसायटीतील एका घराचा कडीकोयंडा तोडून घरात चोरी केली आहे. या चोरीप्रकरणी मोहन रिजन्सी संकुलातील रहिवासी महादेवन अय्यर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
आधारवाडी तुरूंग रस्त्यावरील मोहन रिजन्सी संकुलाच्या आवारात साईबाबांचे मंदिर आहे. या मंदिरात दानपेटी आहे. रात्रीच्या वेळेत मंदिराचा मुख्य दरवाजा कुलूप लावून बंद केला जातो. मंगळवारी रात्री मंदिर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी रात्रीच्या वेळेत मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले. या संकुलाच्या मुख्य प्रवेशव्दारावर रखवालदार तैनात असतो. त्याच्यासाठी स्वतंत्र चौकी प्रवेशव्दारावर आहे.
पहाटेच्या वेळेत रखवालदार चौकीत झोपला आहे पाहून काही चोरटे तोंडाला कपड्याने झाकून सोसायटीच्या आवारात प्रवेश करतात. ते प्रथम मंदिराच्या दिशेने येतात. ते मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळील दानपेटी फोड़तात. दानपेटीतील सुमारे वीस हजाराहून अधिक रकमेची रक्कम चोरटे ताब्यात घेतात. त्यानंतर ते बाजुला बंद असलेल्या सदनिकेचा दरवाजा फोडतात. त्या घरातील काही ऐवज चोरतात, असे मोहन रिजन्सी संकुलातील सीसीटीव्ही चित्रणातून उघडकीला आले आहे.
पाळत ठेऊन चोरट्यांनी ही चोरी केली असण्याचा सदस्यांना संशय आहे. बुधवारी सकाळी मंदिरातील सदस्य साईबाबा मंदिरात पुजेसाठी आले. तेव्हा त्यांना गर्भगृहा समोरील दानपेटी फोडलेली आणि ती एका बाजुला फेकून दिलेली आढळली. मंदिरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यामधील सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याचे आढळले. मंदिरात चोरी झाली असल्याचे मंदिर व्यवस्थापन समितीला समजले.
समिती पदाधिकाऱ्यांनी तात्काळ खडकपाडा पोलिसांना ही माहिती दिली. सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात आले. त्यावेळी तीन ते चार जणांनी तोंड झाकून ही चोरी केली असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मोहन रिजन्सी संकुलातील सदस्य महादेवन अय्यर यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला. साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड या चोरी प्रकरणाचा तपास करत आहेत.
गेल्या वर्षभरात ९० फुटी रस्त्यावरील कचोरे गाव हद्दीतील गावदेवी मंदिर, डोंबिवलीतील तीन ते चार मंदिरांमध्ये चोरट्यांंनी केल्या आहेत. गावदेवी मंदिर चोरीप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी एका चोरट्याला अटक केली होती. कल्याण, डोंबिवली परिसरात पुन्हा घरफोड्या वाढू लागल्या आहेत. बहुतांशी चोरटे शहर परिसरातील झोपडपट्टया, बेकायदा चाळींमधील खोल्यांमध्ये लपून राहत असल्याची चर्चा आहे.