कल्याण: कल्याण पूर्वेत काटेमानिवली भागातील एका उद्योजकाला बनावट पिस्तुलचा धाक दाखवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न दोन इसमांनी केली. उद्योजकाने चपळाई करून दोन्ही इसमांना आपल्या कार्यालयातील दालनात कोंडून ठेवले. कोळसेवाडी पोलिसांना यासंदर्भातची माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन अटक केली.आपल्या मित्रा विरुध्द उद्योजकाने पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार केली म्हणून खंडणीसाठी अटक करण्यात आलेल्या इसमांच्या मित्रांनी रविवारी दिवसा उद्योजकाच्या घरावर दगड आणि लाकडी दांडके फेकून घराचे नुकसान केले. शनिवारी हा खंडणीचा प्रकार उद्योजक मोहम्मद शब्बीर शेख (४१) यांच्या कारखान्यात घडला. उद्योजक शेख यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी सुभान पठाण, सिध्दार्थ अहिरे यांच्या विरुध्द तक्रार केली आहे.

मोहम्मद शेख आपल्या कुटुंबीयांच्या साहाय्याने काटेमानिवली भागात एक हस्तद्योग अनेक वर्षापासून करतात. शनिवारी या कारखान्यात सुभान पठाण आला. त्याने मोहम्मद शेख यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांच्या मागणीकडे उद्योजक शेख यांनी दुर्लक्ष केले. पठाण याने जवळील पिस्तूल बाहेर काढून शेख यांना धमकी दिली. शेख आपणास दाद देत नाहीत म्हणून पठाण याचा कारखान्याच्या बाहेर उभा असलेला मित्र सिध्दार्थ अहिरे तेथे आला. दोघांनी मिळून शेख यांच्याकडे एक हजार रूपयांची मागणी केली. पैसे मिळत नाही दिसल्यावर सुभान पठाण यांनी जवळील पिस्तूल शेख यांच्या कानशिलाजवळ लावले आणि त्यांना मारहाण सुरू केली.

मारहाण सुरू होताच चपळाई करून उद्योजक शेख यांनी पठाण आणि अहिरे यांना आपल्या कार्यालयीन दालनात कोंडून बाहेरून दरवाजा लावून घेतला. आणि तात्काळ पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन दोघांना अटक केली. कारखान्यातील सीसीटीव्हीमध्ये मारहाण, पिस्तुलाचा प्रकार कैद झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुभान पठाण विरुध्द उद्योजक शेख यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली याचा राग येऊन सुभानच्या चार साथीदारांनी रविवारी दुपारी उद्योजक शेख यांच्या घरावर हल्ला चढविला. लोखंडी सळई, लाकडी दांडके आणि दगडफेक करून त्यांनी उद्योजकाच्या घराचे नुकसान केले आहे. या खंडणी मागणाऱ्या टोळीचा पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी कल्याण पूर्वेतून करण्यात येत आहे. या टोळीच्या दहशतीने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या इसमांनी आणखी कुठे खंडणी मागण्याचे प्रकार केले आहेत का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.