कल्याण: पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कल्याण पूर्व, पश्चिम भागात दोन दिवसात गांजा, मेफोड्रेन या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ग्राहकांना विक्रीसाठी आणलेला साठ हजार रूपयांचा गांजा, एम. डी. पावडरचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान कोळसेवाडी पोलिसांचे गस्ती पथक पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. गस्तीवरील पोलिसांना कल्याण पूर्वेतील विजयनगर आमराई भागात एका चाळीत राहत असलेला आकाश गणेश गायकवाड (२७) हा इसम गांजाची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आकाश गायकवाड राहत असलेल्या चाळीवर अचानक छापा मारला. त्यावेळी पोलिसांनी २११ ग्रॅम वजनाचा प्लास्टिक पिशवीत वाळलेला उग्र वास येत असलेला गांजा आढळून आला.
याशिवाय या गांजाच्या पुड्या तयार करण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा गठ्ठा, पिशवी बंदिस्तचे साहित्य आढळले. पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी करून त्याला तात्काळ अटक केली. गांजा आकाश गणेश गायकवाड यांनी कुठून आणला होता. तो या गांजाची कुठे विक्री करणार होता. आकाश कधीपासून ही उलढाल करतो याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांंच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. भालेराव, साहाय्यक पोलीस निरीक्षक वाय. एम. धोंगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हवालदार दत्तु महादेव जाधव यांच्या तक्रारीवरून आकाश गायकवाडवर अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्याने गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या एका प्रकरणात, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलिसांनी आंबिवलीतील इराणी वस्ती भागातील कुख्यात गुलाम मोसन खान उर्फ इराणी (३५) याला इंदिरनगर झोपडपट्टी, वाल्मिकी शाळा भागातून ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५६ हजार रूपये किमतीची मेफोड्रेन पावडर जप्त केली. खडकपाडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाम खान याच्यावर यापूर्वी महात्मा फुले पोलीस ठाणे, खडकपाडा पोलीस ठाणे, भिवंडीतील नारपोली ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल आहेत.
कल्याण, डोंबिवली परिसरातील अंमली पदार्थांचे अड्डे उध्वस्त करण्याचे, या पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची धरपकड मोहीम पोलिसांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून सुरू केली आहे. विशेष पथक आणि स्थानिक पोलीस ही संयुक्तपणे कारवाई करत आहेत.