कल्याण : कल्याण पूर्वेत काटेमानिवली महालक्ष्मी शाॅपिंंग सेंटर भागात बुधवारी रात्री दोन गटात पूर्व वैमनस्यातून तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एका बाजुने दोघे जण तर समोरच्या बाजुने सात जण असे नऊ जण काटेमानिवली भागात एकमेकांंवर दगडफेक करून परस्परांना जखमी करत होते. यावेळी या गटांनी परिसरातील घरांवर, महावितरणच्या रोहित्रावर, परिसरात उभ्या केलेल्या वाहनांंवर दगडी मारून, लाकडी दांडक्याने वाहनांचा काचा फोडून परिसरातील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे.

या घटनेने या तरूणांना पोलिसांचा धाक आहे की नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या नऊ तरूणांनी केलेल्या नुकसानाची भरपाई करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त रहिवाशांनी पोलिसांकडे केली आहे. देवेंद्र रामजी प्रसाद (४६) या इस्टेट एजंटची इनोव्हा कार तरूणांनी दगडी, लाकडी दांडके मारून फोडून टाकली आहे. त्यामुळे देवेंद्र यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी कल्याण पूर्व कोळसेवाडी भागात राहणारे तुषार वाल्मिकी, अरविंद राजा नायडू, आशीष प्रेमचंद पांडे, आनंद चक्कीवाला, राजा पंडित, टाॅम बच्चू, राहुल गुप्ता, प्रेमगुप्ता उर्फ गुंंडा, अरबाज या तरूणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा… डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या शुभेच्छा फलकांनी कल्याण, डोंबिवली शहरांचे विद्रुपीकरण; प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना फलक न काढण्यासाठी दमदाटी

पोलिसांनी सांंगितले, काटेमानवली भागात राहणारे तुषार, अरविंद राजा हे इतर भागातून बुधवारी रात्री पायी आपल्या घरी येत होते. त्यावेळी त्यांना इतर सात आरोपींनी काटेमानिवली भागातील महालक्ष्मी शाॅपिंग सेंटर येथे अडवले. त्यांना जुन्या भांडणा विषयी जाब विचारला. यावेळी त्यांच्यात बोलाचाली होऊन दोन्ही गटांनी एकमेकांना बेदम मारहाण करत, एकमेकांवर दगडफेक करत परिसरातील घरांवर दगडी फेकल्या. अनेकांच्या घरांची कौले फुटली. रस्त्यालगत उभ्या केलेल्या देवेंद्र प्रसाद यांची इनोव्हा, योगेश गावकर यांची प्रवासी वाहतुकीची मोटार, मुस्कान यादव यांच्या घरावर दगडफेक करून नुकसान केले आहे. महावितरणच्या रोहित्राच्या जीवंत वीज वाहिन्या दगडीने तोडून टाकल्या. त्यामुळे परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला.

हेही वाचा… डोंबिवलीतील अमुदान कंपनी स्फोटातून दोन मृतदेहांची ओळख बारा दिवसांनी पटली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तुफान दगडफेकीने परिसरात दगडांचा पाऊस पडत होता. एखादा दगड लागून आपला जीव जाईल या भीतीने परिसरातील रहिवासी घरात लपून बसले. ही माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. या भागात येणारी वाहने दुसऱ्याने मार्गाने वळविण्यात आली. या भागात दहशतीचे वातावरण आरोपींनी निर्माण करून रहिवाशांचे नुकसान केले, म्हणून पोलिसांनी दोन्ही गटांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.