ठाणे : मुंब्रा येथील मुंब्रा बाह्यवळण मार्गालगत एमडी हे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. पोलिसांंनी त्याच्याकडून एक कोटी ६९ लाख २६ हजार रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला. मोहनलाल जोशी उर्फ शर्मा (५५) असे अटकेत असलेल्या व्यक्तीचे नाव असून तो पालघर जिल्ह्यातील वाडा येथील रहिवासी आहे. त्याने हे अमली पदार्थ कुठून आणले याबाबतचा तपास पोलिसांकडून सरु आहे अशी माहिती सोमवारी ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्याकाही दिवसांपासून ठाणे पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोहीम आखली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेची पथके, अमली पदार्थ विरोधी पथके, पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. ठाणे पोलिसांनी मागील दीड वर्षांत सुमारे पाच हजार जणांना अमली पदार्थ सेवन आणि विक्री प्रकरणात अटक केली आहे. तसेच सुमारे ३० कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला.
दरम्यान, मुंब्रा बाह्यवळण मार्गालगत एकजण एमडी हे अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांच्या पथकाने बाह्यवळण मार्गालगत सापळा रचला. त्याचवेळी एक मोटार संशयास्पदरित्या वाहतुक करत असल्याचे त्यांना आढळून आले. पथकाने तात्काळ ती मोटार थांबविली. मोटारीमधील साहित्य पोलिसांनी तपासले असता, त्यामध्ये एक कोटी ६९ लाख २६ हजार रुपये किमतीचे एक किलो २०९ ग्रॅम न वजनाचे एमडी हे अमली पदार्थ आढळून आले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात मोहनलाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेचे अपर पोलीस आयुक्त डाॅ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, साहाय्यक पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद नाईक, दिपक जाधव, भरत आरवंदेकर, पोलीस हवालदार नंदकुमार पाटील, धनंजय आहेर, शशीकांत सावंत, महिला पोलीस नाईक तेजश्री शेळके, पोलीस शिपाई मयुर लोखंडे, सागर सुरळकर यांनी केली.