नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर झालेली प्रभाग रचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वन मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्षाचे नवे कारण ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महापालिका आयुक्त डाॅ.कैलाश शिंदे यांनी जाहीर केलेल्या प्रभाग आराखड्यांच्या प्रारुप अधिसूचनेमुळे भाजप आणि विशेषत: नाईक यांच्या कडव्या समर्थकांमध्ये कमालिची अस्वस्थता पसरली असून या आखणीत ‘ठाण्याचा’ प्रभाव राहील्याच्या तक्रारी आता ही मंडळी करु लागली आहेत. दरम्यान, ‘प्रभाग रचनेच्या माध्यमातून आपल्याला धक्का देण्याचा हा डाव मी उधळून लावेन, तुम्ही निश्चीत असा रहा’ असा संदेश नाईक यांनी शनिवारी रात्री उशीरापर्यत चाललेल्या बैठकीत समर्थकांना दिला.
प्रभाग रचनेत जाणीपुर्वक करण्यात आलेल्या चुका, काही प्रभावी नगरसेवकांचे ‘बालेकिल्ले’ तोडण्यासाठी करण्यात आलेल्या कसरती आणि शिंदे समर्थकांसाठी पोषक ठरतील अशापद्धतीने करण्यात आलेली प्रभाग रचनांची संपूर्ण माहिती गोळा करुन मुख्यमंत्र्यांकडे सादर केली जाणार आहे, या शब्दात नाईकांनी माजी नगरसेवकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. निवडणुक आयोगाच्या वेळापत्रकानुसार महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी रात्री १११ सदस्यसंख्या असलेल्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा हरकती आणि सूचना मागविण्यासाठी जाहीर केला. चार सदस्यांचे २७ तर तीन सदस्यांचा एक अशा एकूण २८ प्रभागांचा हा आराखडा जाहीर झाल्यापासूनच वादग्रस्त ठरु लागला आहे.
नवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदे यांच्या शिवसेनेत उभा वाद आहे. महापालिका निवडणुकीत प्रभाग रचनांची आखणी अनेकदा महत्वाची ठरते. चार सदस्यसंख्या असलेल्या पॅनल पद्धतीत तर प्रभाग कसे पडतात याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष असते. ही सर्व प्रक्रिया निवडणुक आयोगाने आखून दिलेल्या नियमानुसार स्थानिक प्राधिकरणांमार्फत केली जात असली तरी त्यावर राज्याच्या नगरविकास विभागाचा प्रभाव रहातो अशी चर्चा नेहमीच रंगते. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका हद्दीत प्रभाग रचनांचे आराखडे कसे रहातात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागाची असलेली सुत्र आणि वन मंत्री गणेश नाईक यांच्याशी सतत होत असलेला राजकीय संघर्ष लक्षात घेता ही रचना कोणासाठी पोषक ठरते याकडेही अनेकांचे लक्ष होते. दरम्यान, प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर शिंदेसेना आणि नाईकांच्या गोटातून जाहीर प्रतिक्रिया उमटल्या नसल्या तरी वाशी रात्री उशीरापर्यत झालेल्या एका बैठकीत वन मंत्री नाईक यांनी आपल्या समर्थकांसोबत साधलेल्या संवादात मात्र आरपारच्या लढाईची भाषा वापरल्याने यावरुन नवा संघर्षाला तोंड फुटेल असी शक्यता आहे.
नेमके काय घडले आहे ?
आयुक्त कैलाश शिंदे यांनी जाहीर केलेले प्रभाग आराखडे नियमाला धरुन नाहीत अशा पद्धतीच्या तक्रारी समर्थकांनी आणि काही माजी नगरसेवकांनी शनिवारी गणेश नाईक यांच्याकडे केल्याचे समजते. काही प्रभावी नगरसेवकांचे प्रभाग नव्या रचनेत उभे आडवे तोडले गेल्याचा सुर या मंडळींनी बैठकीत लावला. शिंदे यांचे समर्थक असलेल्या माजी नगरसेवकांना पोषक ठरेल अशा पद्धतीने अनेक ठिकाणी ‘पॅनल’ आखले गेले आहेत असा आरोपही यावेळी करण्यात आला. दरम्यान, ‘हा सगळा डाव मला पुर्णपणे माहित आहे, त्यामुळे तुम्ही निश्चित
रहा मी निकराची लढाई देईन ’ या शब्दात नाईकांनी यावेळी समर्थकांना धिर देण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. ‘आपण हरकती नोंदवू, मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यानिशी बाजू मांडू, वेळ पडली तर न्यायालयात दाद मागू’ असेही नाईक या बैठकीत म्हणाल्याच समजते. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना मात्र यासंबंधी नाईक यांनी कोणतीही जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यासंबंधी शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांनीही कोणतीही प्रतिक्रिया उशीरापर्यत व्यक्त केली नव्हती.
प्रभाग रचने दरम्यान सादर करण्यात आलेले आराखडे पाहून आम्ही चकित झालो आहोत. यासंबंधी काही नियम असतात. या नियमांना अनेक ठिकाणी हरताळ फासली गेली आहे. काही प्रभागांची रचना तर गोंधळून टाकणारी आहे. त्यावर अभ्यास सुरु आहे. कुणी कितीही प्रयत्न करा, कसेही प्रभाग आखून घ्या. नवी मुंबईकर सत्याच्या बाजूने उभे रहातील हा आम्हाला विश्वास आहे. – सागर नाईक, माजी महापौर नवी मुंबई</strong>