शहापूर : तालुक्यातील आवाळे ग्रामपंचायत हद्दीत वारंवार विजेचा लपंडाव सुरु असल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारा विरोधात शहापूरात शांतता मोर्चा काढून लक्ष वेधले. यावेळी आवाळे ग्रामपंचायत हद्दीतील जीर्ण झालेल्या वीज वाहक तारा, जीर्ण विद्युत खांब, बंद पडलेले रोहित्र तात्काळ बदली करून द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहापूर तालुक्यातील माहुली किल्याच्या पायथ्याशी वसलेल्या आवाळे ग्रामपंचायत मध्ये आवाळे, माहुली, चांदरोटी, कराडे मामनोली गावांसह शेकटपाडा, पाचलकर पाडा, जुनवणे, खरपडे पाडा, मोरखोप असे १८ पाडे आहेत. या भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होतो. परंतु या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
या पार्श्वभूमीवर सरपंच प्रदीप आगीवले यांच्या नेतृत्वाखाली शहापूरात शांतता मोर्चा काढण्यात आला. यावेळी जुने जीर्ण झालेले विजेचे खांब, वीज वाहक तारा बदलाव्यात तसेच आवाळे, माहुली, वाडुपाडा, चांदरोटी, आंबेडोह, कराडे, सुतारपाडा, शेकटपाडा, मामनोली, जुनवनीपाडा व माहुली शिवमंदिर येथील रोहित्रच्या जीर्ण झालेल्या विद्युत तारा बदलण्यात याव्या, तसेच काटेकुई, शाळेचापाडा, बोरीचापाडा येथे नवीन रोहित्र बसविणे अशी मागणी केली आहे. वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने गेल्या महिन्याभरापासून चांदरोटी व मामनोली पाणी योजना बंद झाली आहे. त्यामुळे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याकडे देखील वीज वितरण कंपनीचे लक्ष वेधण्यात आले.