शहापूर: शहापूर येथील गोपाळनगर भागात मंगळवारी रात्री विजेच्या खांबावर झाड उन्मळून पडल्याने शहापुरातील बहुतांश भागात तब्बल वीस तास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. दिवसभर उन्हाची दाहकता आणि रात्री वीज गायब झाल्याने प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले. रात्रभर वीजे अभावी आणि डासांचा त्रास सहन करत नागरिकांना रात्र जागूनच काढावी लागली.

वारंवार विद्युत पुरवठा गायब होत असल्याने बँकेचे कामकाज, शासकीय कार्यालये यांसह व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. लघु उद्योजकांसह व्यापारी वर्गातून महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला होता. त्यामुळे गोपाळनगर येथील एक झाड उन्मळून विजेच्या खांबावर पडले. त्यामुळे शहापूर येथील अनेक भागात तब्बल २० तास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. त्यातच, डासांमुळे लहान बालके, वृद्ध, रुग्णांना त्रास सहन करावा लागला. शहापूर भागात लघु उद्योग आहेत. त्या उद्योगांवरही त्याचा परिणाम झाला होता. व्यापाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली. बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास येथील विद्युत पुरवठा सुरळीत झाला.

गेल्याकाही दिवसांपासून झाडे उन्मळून पडल्यामुळे विजेच्या तारा तुटण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होऊन नागरिकांचे हाल होत आहेत. महावितरणकडून दरवर्षी विद्युत पुरवठा खंडित करून दुरुस्तीची कामे केली जातात. असे असताना पावसाळ्यात सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत असल्याने दुरुस्तीच्या कामाविषयी नागरिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील काही दिवसांपासून सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने संगणक व इतर यांत्रिक वस्तूंमध्ये बिघाड झाल्याच्या घटनांसह घरगुती विद्युत उपकरणे देखील नादुरुस्त होत आहेत. महावितरणच्या कार्यालयात दूरध्वनीची सुविधा उपलब्ध नसल्याने विजेच्या समस्यांबाबत तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पाणी योजनेवरही विपरीत परिणाम होत असून कृत्रिम पाणीटंचाईचा सामना नागरिकांना सहन करावा लागत आहे.