डोंबिवली – ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या एका १९ वर्षाच्या शाळकरी मुलाने भरधाव वेगात दुचाकी चालवून दुचाकीवरून चाललेल्या एका महिलेच्या दुचाकीला पाठीमागून जोराने शनिवारी संध्याकाळी धडक दिली. या धडकेत महिला दुचाकीसह रस्त्यावर पडली. त्यांच्या पायाच्या घोट्याचे हाड मोडले आहे. सर्वांगाला गंभीर दुखापती झाल्या आहेत. निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघात केल्याने गंभीर जखमी महिलेच्या पतीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी ठाकुर्लीतील चामुंडा गार्डन परिसरातील संकुलात राहत असलेले आशिष विठ्ठलराव बोढाळे यांच्या तक्रारीवरून अपघात करणारा दुचाकी स्वार विद्यार्थी दिव्येश रमेश परब (१९) याच्या विरूध्द रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी या अपघात प्रकरणी गु्न्हा दाखल करून घेतला आहे. दिव्येश परब हा डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा भागातील योगम रेसिडेन्सी भागात कुटुंबीयांसह राहतो. तो एका शाळेत शिक्षण घेत आहे. ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील म्हसोबा चौकातील मिरानोज दुकानाच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर हा अपघात शनिवारी संध्याकाळी घडला आहे.

डोंबिवली, कल्याणमध्ये विविध रस्त्यांवर महाविद्यालयीन, शाळकरी मुले एकेका दुचाकीवर तीन ते चार जण बसून भरधाव वेगात दुचाकी चालवितात. अनेक वेळा दुचाकीवर आरडाओरडा करत, मौजमजा करत, अन्य वाहनांना चकवा देत वाहन चालवित असल्याचे दृश्य आहे. विद्यार्थी महाविद्यालयात चालला आहे म्हणून अनेक वेळा या मुलांकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करतात. पण त्याचा त्रास आता इतर वाहन चालकांना होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

आशिष बोढाळे यांनी रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपली पत्नी जयश्री बोढाळे या ठाकुर्ली ९० फुटी रस्ता म्हसोबा चौक भागात वेगमर्यादा पाळत दुचाकीवरून चालल्या होत्या. त्याच्या वेळी त्यांच्या पाठीमागून गुन्हा दाखल विद्यार्थी दिव्येश रमेश परब भरधाव वेगात दुचाकी चालवत येत होता. तो बाजुने् निघून जाईल पत्नी जयश्री यांना वाटले. पण त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या दिव्येशने दुचाकीसह पत्नी जयश्री यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.

पाठीमागून वेगाने दुचाकीने धडक दिल्याने जयश्री या दुचाकीसह रस्त्यावर पडून काही अंतरापर्यंत फरफटत गेल्या. वेगाने दुचाकीसह रस्त्यावर आपटल्याने जयश्री यांच्या पायाच्या पंजाचे हाड मोडले आहे. तसेच, त्यांच्या सर्वांगाला रस्त्यावरून फरफटत गेल्याने दुखापती झाल्या आहेत. दिव्येश याच्याकडे वाहन चालविण्याचा परवान नव्हता. त्यामुळे आपल्या पत्नीच्या दुचाकीला धडक देऊन अपघात करून तिला गंभीर जखमी केल्याने आशिष बोढाळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे याप्रकरणाचा तपास करत आहेत.