ठाणे : येथील सर्वाधिक वर्दळीचा चौक असलेल्या तीन हात नाका चौकात सिग्नल यंत्रणेच्या खांबाजवळ वीजेचा धक्का लागून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर केलेल्या तपासणीत सिग्नलच्या खांबामधून वीज प्रवाह होत नसल्याचे समोर आले असून यामुळे सिग्नल खांबामुळे वीजेचा धक्का लागला नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे येथील तीन हात नाका चौकात सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. या चौकातील वाहतूकीचे नियंत्रण करण्यासाठी पालिकेमार्फत सिग्नल यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. यातील एका सिग्नल यंत्रणेच्या खांबालागूनच एक शिडी ठेवण्यात आलेली होती. गुरुवारी सायंकाळी एक मुलगा खेळत असताना सिग्नल खांबाला लागून असलेल्या शिडीवर चढला. त्यावेळी वीजेचा धक्का लागला आणि तो खाली पडला. मुलाच्या वडीलांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली असता, त्यांनाही वीजेचा धक्का बसल्याचे सुत्रांनी सांगितले. नौपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक एस.एस. कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता, सिग्नल खांबालागून असलेल्या शिडीवर चढलेल्या एका दहा वर्षीय मुलाला वीजेचा धक्का लागला आणि त्यात त्याचा मृत्यु झाला आहे. त्याला वीजेचा धक्का नेमका कसा लागला याचा तपास सुरू आहे.
या संदर्भात ठाणे महापालिका विद्युत विभागाच्या उपनगर अभियंता शुभांग केसवानी यांच्याशी संपर्क साधला असता, या घटनेच्या माहिती मिळाल्यानंतर आमच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी गेले आणि सिग्नल यंत्रणेच्या खांबाची तपासणी केली. त्यावेळी खांबातून कोणत्याही प्रकारचा विद्युत प्रवाह होत नसल्याचे आढळून आले. तसेच खांबामुळे वीजेचा धक्का लागला असता तर, सिग्नल यंत्रणेची कळ बंद (बटण ट्रीप) होऊन सिग्नल यंत्रणा बंद पडली असती. मात्र, तसे काहीच झालेले नसून सिग्नल यंत्रणा सुरळीतपणे सुरू आहे. या खांबाच्या वरून इतर संस्थांच्या विद्युत तारा गेल्या असून त्यामुळे ही घटना घडली का, हे सांगता येत नाही, असे त्यांनी सांगितले.