ठाणे : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सहभाग असल्याचे भासवून एका भामट्याने ७८ वर्षीय व्यक्तीची ६८ लाख रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात वृद्ध व्यक्ती त्यांच्या पत्नीसोबत वास्तव्यास आहेत. बँक खात्यातील बचत आणि पत्नीच्या निवृत्ती वेतनावर त्यांचे कुटुंबखर्च चालतो. २२ नोव्हेंबरला त्यांना एका व्यक्तीने संपर्क साधला. त्यांना क्रेडीट कार्ड पाठविण्यात आले असून त्याचे एक लाख रुपये थकित असल्याचे त्या व्यक्तीने त्यांना सांगितले. परंतु मी कोणतेही क्रेडीट कार्ड वापरीत नसल्याचे वृद्धाने त्याला सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने आपण व्यवस्थापकाला संपर्क जोडून दिला. त्यावेळी त्या व्यवस्थापकाने तुमची फसवणूक झाली असून मुंबई सायबर पोलिसांना संपर्क करून देतो अशी बतावणी केली. काहीवेळाने वृद्धाला एक व्हिडीओ काॅल प्राप्त झाला. त्यावेळी त्यांच्या समोर पोलिसांच्या गणवेशातील एक व्यक्ती होता. त्याने आपण सायबर पोलीस अधिकारी रवी कुमार असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने वृद्धाकडून आधारकार्ड क्रमांक मागितला. वृद्धाने आधारकार्डची माहिती दिल्यानंतर त्या व्यक्तीने या आधारकार्डचा वापर करून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगितले. तसेच त्यांना आणि त्यांच्या पत्नीला या प्रकरणात अटक होऊ शकते अशी बतावणी केली. तसेच हे प्रकरण सीबीआयला वर्ग करण्यात आल्याचेही त्या भामट्याने सांगितले.

हेही वाचा : मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून कोकणात भराडी आईचे दर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही वेळाने त्यांना आणखी एक व्हिडीओ काॅल करण्यात आला. त्यावेळी त्या व्यक्तीने आपण आकाश कुल्हारू सीबीआर अधिकारी असल्याची बतावणी केली. सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला अटक करण्याचे आदेश दिल्याचे वृद्धाला सांगितले. त्यानंतर आणखी एक व्हिडीओ काॅल जोडण्यात आला. त्यामध्ये एक व्यक्ती वकिलांच्या वेशात होता. तुम्हाला अटक करावीच लागेल असे त्या व्यक्तीने सांगितले. या प्रकारामुळे दाम्पत्या घाबरले. काहीवेळाने त्यांना पुन्हा संपर्क साधण्यात आला. जर अटक टाळायची असेल तर तुमच्या साथिदाराने फसवणूक केलेले दोन कोटी ५६ लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी त्यांनी केली. परंतु इतके पैसे नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर भामट्याने त्यांच्या बँक खात्यात किती रक्कम आहे याबाबत विचारणा केली. त्यावेळी वृद्धाने बँक खात्यात ४५ लाख रुपये आणि मूदत ठेव २५ लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या भामट्याने त्यांच्या बँक खात्यात ६८ लाख रुपये पाठविण्यास सांगितले. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास कुटुंबियांना धोका निर्माण होऊ शकतो अशी धमकी देखील दिली. काही दिवसांनी त्या वृद्धाने याबाबतची माहिती मुलीला दिल्यानंतर फसवणूक झाल्याचे समोर आले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.