ठाणे : ठाण्यातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या गडकरी रंगायतन आणि तलावपाली परिसरातील रस्ता मंगळवारी रात्री खचला. रस्त्याच्या कडेला असलेले ड्रेनेजचे चेंबर खचून रस्त्यावरती अंदाजे दहा फूट खोल खड्डा पडला असून या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. तसेच अपघात होऊ नयेत यासाठी खड्डा पडलेला परिसरात धोकापट्टी लावण्यात आली आहे.
ठाणे शहराचे सांस्कृतिक केंद्र म्हणून गडकरी रंगायतन नाट्यगृह ओळखले जाते. मासुंदा तलावाशेजारी हे नाट्यगृह आहे. या परिसरातील रस्ते ठाणे स्थानक परिसराशी जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. असे असतानाच या मार्गाच्या कडेला असलेले ड्रेनेजचे चेंबर खचून रस्त्यावरती अंदाजे दहा फूट खोल खड्डा पडल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. मात्र, रस्ता खचण्याचे कारण समजू शकलेले नाही. रस्त्याच्या कडेला हा प्रकार घडला असून उर्वरित रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे.
गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या बाजूला, एचडीएफसी बँक समोर डॉ. मुझ रोडवरती ड्रेनेज चेंबरचे झाकण खचले आणि रस्त्यावरती अंदाजे दहा फूट खोल खड्डा पडला.याबाबत स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळल्यानंतर नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता(ड्रेनेज विभाग ) आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली. खड्डा पडलेल्या ठिकाणी सुरक्षतेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी बॅरिगेटिंग करून धोकापट्टी लावली आहे. याबाबत संबंधित विभागाला कळविण्यात आले असून संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.