ठाणे : ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवनघाट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या हस्ते शुक्रवारी ५१ फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचे अनावरण मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी परिसरात “विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल” असा जयघोष घुमला, आणि हजारो भाविकांनी एकत्र येत या ऐतिहासिक सोहळ्याला साक्षीदार ठरले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे गुरू व दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे ( Anand Dighe ) यांची एक आठवण सांगितली.
ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवनघाट येथे ५१ फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचा अनावरण कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांचे संवाद साधताना आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. या सोहळ्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजचा दिवस ठाणेकरांसाठी पवित्र आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात आपण भगवान पांडुरंगाची सेवा करतो, पण आज तुमच्या सर्वांच्या रूपाने पांडुरंग येथे उपस्थित आहे. पांडुरंगाची ५१ फूट उंच अशा भव्य मूर्तीची स्थापना ठाण्यात झाली आहे. हे कार्य प्रताप सरनाईक आणि त्यांच्या टीममुळे शक्य झाले. ठाणेकर भाग्यवान आहेत, असे शिंदे म्हणाले. ठाणे बदलत आहे. हा घाट अहिल्यादेवींच्या नावाने उभारला आहे. मिरा-भाईंदर येथे २ आणि कासार वडवली येथे १ अशा चार ठिकाणी अशा विठ्ठल मूर्ती उभारल्या जातील, असे ते म्हणाले.
माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट
मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. गोमातेला राज्य मातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. शंकराचार्यांनी मला ‘काऊ मॅन’ ही पदवी दिली आणि ते माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. लहानपणी आजी-आजोबा, आई-वडिलांसोबत पंढरपूरला जात होतो. आज उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर विठ्ठल भक्त म्हणून येथे आलो आहे. वारकरी दिंड्यांना अनुदान, विमा आणि वाहन टोलमुक्ती हे महायुती सरकारनेच केले. पंढरपूरमध्ये स्वच्छता, पाणी, मोबाईल सुविधा, शौचालये उपलब्ध केली आहेत, असे शिंदे म्हणाले.
आनंद दिघेंनीच आम्हाला ही शिकवण दिली”
मी चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन आहे. तुमच्या आशीर्वादाने शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास शक्य झाला. वारकरी संप्रदाय जिथे बोलावतो तिथे धावून येतो. इंदुरीकर महाराज साध्या, सोप्या भाषेत समाजाला दिशा देतात. हरिनाम सप्ताहात सहभागी झाल्याने वाईट विचार जातात, अशी शिकवण आम्हाला आनंद दिघे यांनी दिली, असे सांगत शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
