ठाणे – जिल्ह्यात सोमवार पासून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे विविध ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन ही विस्कळीत झाले होते. या मुसळधार पावसाचा जिल्ह्यातील पिकांना देखील फटका बसत असल्याचे उघड झाले आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील बहुतांश भातपिकांची आणि इतर पिकांची लागवड पूर्ण झाली होती. मात्र आता मुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळे प्रामुख्याने शहापूर मध्ये भाजीपाला आणि भातपिकावर सुरळीतील अळी (बगळ्या) या किडीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून येत आहे. तर यासाठी कृषी विभागाकडून खबरदारी म्हणून विविध उपायोजना देखील राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात भातपिकाची लागवड करण्यात येते. त्यामध्ये शहापूर तसेच मुरबाड या दोन्ही तालुक्यांमध्ये भातपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून कृषी विभागाकडून भातपिकासमवेतच विविध फळपिके आणि भाजीपाला पिकांच्या लागवडीचे क्षेत्र वाढविण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यात मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी पाच हजार १०० हेक्टर जमिनीवर भात पिकासाठी पेरा केला आहे.

जुलै महिन्यात लागवडीसाठी योग्य पाऊस झाल्याने सर्वत्र वेळेत भातपिकांची आणि इतर पिकांची लागवड झाली. यानंतर पिकांच्या वाढीच्या काळात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी अधिक झाल्याने किडीच्या प्रादुभावासाठी पोषक वातावरण निर्माण झाले.

शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील चरीव, अदिवली, आष्टे, बेडीजगाव, सोगाव, खरीवली तसेच डोळखांब भागतील अनेक गावातील शेतात बगळ्या रोगाच्या प्रादुर्भावाने पिकांची पाने पिकली पडणे, वाढ खुंटणे यासह लक्षणे दिसून येत आहेत. उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेंत सापडले आहेत.

नुकसान काय ?

या रोगातील अळी कोवळे पान कापून त्याचे तहान तुकडे करते व त्याची सुरळी करून त्यात राहते. अशा सुरळ्या पानाच्या एका कडेस लटकत किंवा पाण्यावर तरंगत असलेल्या दिसतात. रात्रीच्या वेळेस अळी सुरळीतील पापुद्रा खाते आणि फक्त बाहेरील पापुद्रा शिल्लक ठेवते त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. यामुळे शेत निस्तेज दिसते आणि पिकाची वाढ खुंटते.

प्रादुर्भाव कसा ओळखावा ?

या किडीचा पंतग लहान, नाजूक व दुधाळ पांढऱ्या रंगाचा असून त्याच्या पंखांची लांबी ८-१० मिमी एवढी असते. पंखावर फिकट काळ्या रंगाचे लहान ठिपके असतात. मादी रोपाच्या पानावर सुमारे ५० अंडी घालते. अळी पारदर्शक फिकट हिरवट पांढरट रंगाची असते. पूर्ण वाढलेल्या अळीची लांबी २० मिमी असते.

या किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी शेतात पाणी थांबवून पिकावरून काथ्याचा दोर आडवा धरून २-३ वेळा ओढत न्यावा. त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतात, दोर ओढल्यानंतर तात्काळ पाणी एका बाजूला फोडून लावावे. व तेथे कापड लावून वाहून आलेल्या सुस्ळ्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. तसेच नजीकच्या कृषी केंद्राशी संपर्क साधून याबाबतच्या कीटकनाशकांबाबत आणि इतर उपायोजनांबाबत माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.