ठाणे : मुंबई, ठाणे, पालघर आणि गुजरात भागातील वाहतूकीसाठी महत्वाचा मानला जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील गायमुख ते फाऊंटनपर्यंतचा रस्ता मिरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला असून त्यापाठोपाठ आता याच मार्गावरील कापुरबावडी ते गायमुखपर्यंतचा रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. या विभागाने यासंदर्भात ठाणे महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहारही करत चर्चाही केली असली तरी, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. शहरातील विविध सेवा वाहिन्या रस्त्याखालून जात असल्याचे कारण हस्तांतरणासाठी देण्यात आले आहे.
ठाणे-घोडबंदर या राज्य मार्गाचे बांधकाम २००१ मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने केले होते. या मंडळाने एका खासगी विकासकडून बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर हा रस्ता बांधला होता. या रस्त्यावर पथकर नाका होता. मात्र, पथकर वसुलीचा कालावधी संपुष्टात येताच २३ फेब्रुवारी २०२१ मध्ये हा रस्ता महामंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला. यानंतर या मार्गावरील फाऊंटन हाॅटेल ते गायमुख हा एकूण ४.४० किमी लांबीचा असून हा रस्ता मिरा-भाईंदरकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. असे असले तरी, या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहेत. यापाठोपाठ आता घोडबंदर मार्गावरील कापुरबावडी ते गायमुखपर्यंतचा १०.५० किमी लांबीचा रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे.
घोडबंदर मार्गावरील कापुरबावडी ते गायमुखपर्यंत दोन मार्गिका काँक्रीटच्या तर, एक मार्गिका डांबराची आहे. या मार्गावर मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या मार्गिका, रस्त्याचे गटर हे एमएमआरडीएने मेट्रो कामासाठी अधिग्रहित केले आहेत. तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूस सेवा रस्ते असून ते यापुर्वीच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ठाणे महापालिकेकडे वर्ग केलेले आहेत.
घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते आणि मुख्य रस्ते जोडणीची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहेत. या रस्त्यामध्ये आणि लगत असलेल्या विविध सेवावाहिन्या महापालिकेशी संबंधित आहेत. त्यामुळे या कामात ठाणे महापालिका आणि एमएमआरडीए यांच्यात योग्य समन्वय रहावा, यासाठी हा रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांनी केली होती. त्यानुसार या विभागाने दोन वर्षांपुर्वीच तयार केला असून त्यासंदर्भात पालिकेने पत्र पाठविले होते. मात्र, पालिकेकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा यासंबंधीचे पत्र पाठविले आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. या वृत्तास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांनी देत या संदर्भात ठाणे महापालिकेसोबत चर्चा सुरू असून ते सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.