ठाणे : ठाणे येथील राबोडी भागातील क्रांतीनगर परिसरातील निर्माणधीन नाल्याच्या पाहाणीदरम्यान, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला हे आमने-सामने आले होते. यानंतर हे दोन्ही नेते एकमेकांकडे बघत पुढे निघून गेले. या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे येथे काहीकाळ तणावाचे वातावरण होते.
ठाणे येथील राबोडी भागातून मोठा नाला जातो आणि तो पुढे खाडीला मिळतो. या नाल्यात इंदिरानगर येथील डोंगर भागातून पाणी येते. या नाल्यावर रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी ठाणे शहरात अवकाळी पाऊस झाला. या पावसादरम्यान, नाल्यात पावसाचे पाणी तुंबले आणि ते परिसरातील क्रांतीनगर, शिवाजीनगर भागातील घरांमध्ये शिरले. राबोडी परिसरातून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला हे निवडूण येतात. नाल्यातील पाणी घरांमध्ये शिरल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टिका केली जात आहे. असे असतानाच, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी सायंकाळी क्रांतीनगर परिसरात जाऊन नाल्याची पाहाणी सुरू केली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई हे आव्हाड यांना नाल्याच्या कामामुळे घरांमध्ये पाणी कसे शिरले याची माहिती देत असतानाच, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह तिथे आले. आव्हाड आणि मुल्ला हे दोघे आमने सामने आल्यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण होते. यानंतर हे दोन्ही नेते एकमेकांकडे बघत पुढे निघून गेले आणि त्यानंतर दोघांनी पत्रकारांशी संवाद साधत प्रतिक्रिया नोंदविल्या.
नाल्याच्या कामाची चौकशी करा
इंदीनगर, सावरकरनगर येथील डोंगर भागातून येणारे पाणी हे राबोडी भागातील नाल्यातून वाहते आणि ते पुढे खाडीला जाऊन मिळते. अवकाळी पाऊस झाला, हे सर्वांना मान्य आहे. पण, राबोडी नाल्याच्या कामात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे नाल्यात अवकाळी पावसाचे पाणी तुंबून ते परिसरातील घरांमध्ये शिरून येथील नागरिकांचे नुकसान झाले. त्याची भरपाई पालिका देणार आहे का, अशी विचारणा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. विकास सर्वांनाच हवा आहे. पण, त्याचा मार्ग भ्रष्टाचाराच्या गटारगंगेतून जाणारा नसावा, असे सांगत या नाल्याच्या कामाची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली.
आव्हाडांना टोला
गेल्या चार वर्षांपासून येथे नाल्याच्या निर्माणाचे काम सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यापुर्वी नाल्यातील माती काढण्यात येते. त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले नव्हते. परंतु यंदा नालेसफाईची कामे उशीराने सुरू झाली आणि त्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे घरांमध्ये पाणी शिरले, ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत नागरिकांची दिलगीरी व्यक्त केली. या नाल्याची रुंदी ३ मीटरने वाढविण्याबरोबरच नाल्यावर रस्ता तयार करण्यात येत आहे. खाडीच्या मुखाशी नाल्याची खोली वाढविण्याबरोबर फ्लड गेट बसविण्यात येणार आहे, असे नजीब मुल्ला यांनी सांगितले. तसेच नशीबाने निवडुण आलेल्या आमदारांनी आम्हाला तांत्रिक गोष्टी शिकवू नयेत, असा टोला मुल्ला यांनी आव्हाड यांना लगावला.