वागळे इस्टेट येथील परबवाडी भागात भाजपाच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच हा हल्ला शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप ठाण्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यासंदर्भात भाजपाने ट्वीट करत माहिती दिली आहे.

हेही वाचा – “शिंदे गटातील ३५ आमदारांच्या Y+ सुरक्षेसाठी…”, खर्च सांगत अजित पवारांनी सरकारला खडसावलं; म्हणाले…

भाजपाचे पदाधिकारी प्रशांत जाधव हे ठाण्यातील परबवाडी परिसरात राहतात. गुरुवारी या भागात फलक बसविण्याच्या कारणावरून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपाचे प्रशांत जाधव यांच्यात वाद झाला. या प्रकारानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज दिली होता. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणाहून निघून गेले. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी अचानक १५ ते २० जणांच्या जमावाने प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या घटनेनंतर ठाण्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांनी केल्याचा आरोप केला आहे. त्यांसदर्भात ‘भाजप ठाणे’ या खात्यावरून ट्वीटही करण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याप्रकारानंतर ठाण्यात दोन्ही पक्षांमधील अंतर्गत धूसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – “मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांना…”, अजित पवारांचं एकनाथ शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यात मन रमवू नका!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या हल्ल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. समाजमाध्यमांवर याप्रकाराचा निषेध भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. निषेध व्यक्त करताना “हीच का बाळासाहेबांची शिकवण?” असे संदेश भाजपाकडून प्रसारित केले जात आहे. तसेच भाजपाच्या महिला मोर्चानेही “निषेध रेपाळे भोसले, दोस्ती को दोस्ती..मार को मार..लहू को लहू से जवाब” असा संदेश ट्विटरवर प्रसारित केला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.