ठाणे : घोडबंदर येथील ब्रम्हांड भागात पादचारी वृद्धेच्या गळ्यातील सुमारे ११ तोळ्यांहून अधिक वजनाचे सोन्याचे दागिने दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी खेचून नेले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात वृद्धेने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये नऊ तोळ्याचा सोन्याचा हार, दीड तोळ्याचे मंगळसूत्र आणि नऊ ग्रॅम सोनसाखळी अशा दागिन्यांचा सामावेश आहे.

घोडबंदर येथील पातलीपाडा भागात ६५ वर्षीय महिला तिच्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. त्यांचे मुंबईत देखील एक घर आहे. त्यामुळे त्या घराच्या देखरेखीसाठी नेहमी जात असतात. मंगळवारी त्या मुंबई येथे गेल्या होत्या. त्यानंतर सायंकाळी त्या पुन्हा ठाण्यात येण्यास निघाल्या. त्यांनी ठाणे रेल्वे स्थानक येथून ब्रम्हांडच्या दिशेने वाहतुक करणारी बसगाडीत प्रवेश केला. ब्रम्हांड भागातील एका बसथांब्यावर उतरल्यानंतर त्यांनी घरी जाण्यापूर्वी भाजीपाला खरेदी करण्याचा निर्णय घेतला. रात्री भाजीपाला खरेदी केल्यानंतर त्या एका झाडाखाली थांबल्या. तेथे काहीवेळ बसल्यानंतर त्या पुन्हा घराच्या दिशेने पायी जात होत्या. त्यावेळी रात्री ९ वाजताच्या सुमारास एका दुचाकीवरून दोघे आले. त्यातील चालकाने डोक्यात हेल्मेट घातले होते. तर त्या मागे बसलेल्या त्याच्या सहकाऱ्याने तोंडावर रुमाल बांधला होता. दोघेही वृद्धेच्या दिशेने आले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र आणि हार खेचून नेला.

या घटनेनंतर वृद्धा घाबरल्या. त्या घरी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला याबाबत माहिती दिली. बुधवारी त्यांनी कासारडववली पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या गळ्यातील नऊ तोळ्याचा सोन्याचा हार, दीड तोळ्याचे मंगळसूत्र आणि नऊ ग्रॅम सोनसाखळी असे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्याकाही दिवसांपासून ठाणे शहरात सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. दुचाकीवर येणाऱ्या चोरट्यांकडून असे प्रकार घडत आहेत. वारंवार असे प्रकार घडत असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. मुंबई नाशिक महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर मार्गावर असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ठाणे पोलिसांनी गस्ती घालून आणि परिसरात सीसीटीव्हीचा वापर करून अशा प्रकारांवर आळा घालावा अशी मागणी केली जात आहे. गळ्यातील दागिने खेचत असताना गळ्याला जखम होऊन एखादी दुर्घटना घडण्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे.