ठाणे : टोल दरवाढ प्रश्नावर मागील काही दिवसांपासून मनसे कडून उपोषण सुरू होते. रविवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपोषण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची सूचना करत येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने टोल प्रश्नावरून उडी घेतली आहे. ठाण्यातील चारचाकी हलक्या वाहनांना महायुती सरकारने त्वरित टोलमुक्ती द्यावी अशी मागणी अजित पवार गटाचे प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावरील ठाण्याच्या वेशीवर मुलुंड टोलनाका आहे. १ ऑक्टोबर पासून टोल वाढ झाल्याने मनसेकडून विविध मार्गाने आंदोलन सुरू आहे. मागील चार दिवसांपासून मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शाखाली टोलनाक्यावर जवळ उपोषण सुरू होते. रविवारी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची सूचना केली. तसेच राज्य सरकारवर टीका केली. या नंतर आता अजित पवार गटाने देखील टोलच्या प्रश्नावर सरकारकडे मागणी केली आहे.

हेही वाचा : “उपोषण करणं हे आपलं काम नाही, मी उद्या…”; ठाण्यातील उपोषणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ठाणेकरांना नाहक टोलचा भुर्दंड बसतो. यामुळे एम.एच. ०४ क्रमांकाची पाटी असलेल्या हलक्या वाहनांना टोलमुक्ती करुन ठाणेकर जनतेला त्वरित दिलासा द्यावा अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली. संपूर्ण टोलमुक्तीसाठी एमएससीआरडीएचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन टोलप्रश्नावर धोरण ठरवावे आणि मुंबईतील, दहिसर, ऐरोली, वाशी, आनंदनगर, एलबीएस मुलुंड या पाच टोलनाक्यांवरील टोलप्रश्नावर मार्ग काढून जनतेला, महायुती सरकारने दिलासा द्यावा असेही आनंद परांजपे म्हणाले.

हेही वाचा : जनतेचा टोल आक्रोश मुख्यमंत्र्यांनाही परवडणारा नाही – राज ठाकरे

ज्यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव हे टोलप्रश्नावर साखळी उपोषणाला बसले होते. त्याचवेळी मी म्हटले होते की, अविनाश जाधव यांची ही नेहमीची सवय आहे की काहीतरी नाटकीय आंदोलन करायचे, कार्यकर्त्यांना वेठीस धरायचे, प्रसिद्धीचा स्टंट करायचा आणि अंतिम क्षणी आंदोलन जाईल असे कधीच पहायचे नाही. मी त्याहीवेळेस अविनाश जाधव यांना विनंती केली होती की राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले तर याच्यातुन काहीतरी तोडगा निघू शकतो.२०१० पासून ते २०२६ पर्यत टोलचा करार एमईपीएल बरोबर आहे. दर तीन वर्षांनी १ ऑक्टोबरला पाच रुपये हे टोलमागे वाढविले जातात. मागच्यावेळी १ ऑक्टोबर २०२० ला पाच रुपये टोलमागे वाढविले गेले होते. २०१० पासून टोलवाढीची ही प्रक्रिया सुरू आहे. यातुन जर खऱ्याअर्थाने काही मार्ग काढायचा, जनतेला टोलमुक्त करायचे असेल तर एमएसआरडीचे खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने मुख्यमंत्र्यांना जर राज ठाकरे भेटले तर काही मार्ग निघू शकेल हीच राष्ट्रवादीची भूमिका आहे, असे आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : ठाणे : अपघातात वडिलांचा मृत्यू तर मुलगा जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर महाराष्ट्र प्रवक्ते, पालघर व ठाणे समन्वयक तसेच ठाणे जिल्हाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. ठाणे व पालघर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात महायुतीचा जो उमेदवार असेल त्यांच्या मागे राष्ट्रवादीची ताकद उभी करावी ही माझी भूमिका आहे. निवडणुकीत पडणारी मते ही पक्षाची ताकद असतात. पक्ष भविष्यात जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन असे आनंद परांजपे म्हणाले. २ मे रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारसाहेबांनी राजीनामा दिला तेव्हा आम्हाला देखील अश्रू अनावर झाले होते. पवार साहेबांबाबत आमच्याही आदरयुक्त भावना आहेत. मात्र आम्ही डोळ्यात सारखे अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाहीत. सारखे सारखे अश्रू आणून जितेंद्र आव्हाड काही साध्य करतील असे वाटत नाही, असा टोला आनंद परांजपे यांनी आव्हाड यांना लगावला.